SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची धडक क्षेत्रभेट BLO च्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी; मतदारांच्या घरी जाऊन स्वतः भरून घेतले गणना प्रपत्र
अमळनेर | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेस मंगळवार, दि. ३० जूनपासून प्रारंभ झाला असून ही मोहीम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत BLO यांच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी विविध भागांना भेट देऊन BLO प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करत आहेत का, मतदारांकडून गणना प्रपत्र अचूक व नियमानुसार भरून घेतले जात आहे का, तसेच मोहिमेदरम्यान कोणत्या अडचणी येत आहेत याची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी उद्भवणाऱ्या समस्यांवर आवश्यक सूचना व मार्गदर्शन करत मोहिमेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
भेटीदरम्यान भाग क्रमांक १६९ चे BLO तथा शिक्षक अजय भामरे हे प्रत्यक्ष क्षेत्रात मतदारांच्या घरी जाऊन काम करत असताना प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची अचानक पाहणी केली. त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी मतदार प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत स्वतः गणना प्रपत्र भरून घेतले आणि त्याची एक प्रत त्यांना सुपूर्द केली. तसेच मतदारांना आवश्यक माहिती देत निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
या पाहणीदरम्यान BLO यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत अचूक, पारदर्शक आणि वेळेत सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे BLO यांचे मनोबल उंचावले असून मोहिमेला वेग आणि प्रभावी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

