ब्रेकिंग
द्रौ. रा. कन्या शाळेत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत  फुटबॉल पूजन करून विद्यार्थिनींमध्ये क्रीडाभावना जागृत; विश्वचषक स्पर्धेला दिल्या शुभेच्छा

 

अमळनेर | प्रतिनिधी

जगभरातील अब्जावधी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभानिमित्त खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फुटबॉल व प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यार्थिनींमध्ये क्रीडेप्रती जागरूकता निर्माण करण्यात आली.

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि रोमांचक खेळ मानला जातो. फिफा विश्वचषक हा केवळ क्रीडा स्पर्धा नसून विविध देशांच्या संस्कृती, कौशल्य आणि संघभावनेचा जागतिक उत्सव आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून भारतातही फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफीचे वैशिष्ट्य, फुटबॉल खेळाचा इतिहास तसेच जागतिक स्तरावरील या स्पर्धेचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची क्षमता विकसित होते, यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर, ज्येष्ठ लिपिक श्री. शामभाऊ पवार, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री. मनुभाऊ दीक्षित, श्रीमती जे. एल. पाटील, सौ. संजीवनी देशमुख, श्री. राजेश बिर्‍हाडे, श्री. प्रविण पुरकर तसेच आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी फिफा विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा देत विद्यार्थिनींना नियमित खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “खेळ हा केवळ विजय-पराजयापुरता मर्यादित नसून तो जीवन जगण्याची कला शिकवतो. क्रीडाभावना, शिस्त, संघभावना आणि सकारात्मक दृष्टिकोन यांमुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.”

फुटबॉल पूजन, क्रीडा जनजागृती आणि विश्वचषक स्पर्धेबाबत माहितीपर संवादामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींनीही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

उपशीर्षक:”खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग; क्रीडाभावनेतून घडते सक्षम व्यक्तिमत्त्व” – सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *