ब्रेकिंग
देशातील पहिले ‘एआय मंदिर’ आता ‘व्हीआर दिव्यदर्शन’मुळे पुन्हा चर्चेत श्री मंगळग्रह मंदिरात डिजिटल युगाची नवी क्रांती; घरबसल्या मिळणार 360 अंशांचा दिव्य अनुभव आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित धार्मिक पर्यटनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

 

 

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराने पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधून घेत डिजिटल धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारी अत्याधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, अशी सुविधा उपलब्ध करणारे श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील पहिले आणि एकमेव मंदिर ठरले आहे.

बुधवार, दि. ६ मे रोजी आमदार अनिलदादा पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून या डिजिटल उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘एआय’ यंत्रणेचा शुभारंभ झाला होता. त्यामुळे देशातील पहिले एआय मंदिर म्हणूनही श्री मंगळग्रह मंदिराने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या व्हीआर तंत्रज्ञानामुळे जगभरातील भाविक, पर्यटक आणि श्रद्धाळूंना घरबसल्या मंदिराचा समग्र, जिवंत आणि 360 अंशांतील दिव्य अनुभव घेता येणार आहे. धार्मिक पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारे हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

360 अंशांत मंदिराचा दिव्य फेरफटका

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून भाविकांना मंदिर परिसराचा संपूर्ण आभासी फेरफटका मारता येणार आहे. मंदिरातील विविध देवतांची स्थाने, पूजाविधींची ठिकाणे, गाभारा, सभामंडप आणि परिसर 360 अंशीय दृश्यांमधून पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे, ही सुविधा वापरण्यासाठी कोणतेही स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसून मोबाईल किंवा संगणकावर थेट लिंकच्या माध्यमातून दिव्यदर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात परस्परसंवादी स्पर्शपटल केंद्र देखील उभारण्यात आले असून, त्याद्वारे भाविकांना डिजिटल भ्रमंतीचा अनुभव घेता येणार आहे.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शन उपलब्ध असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना मंदिराची माहिती सहज समजू शकणार आहे. मार्गदर्शित तसेच स्वयंसंचलित असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वृद्ध, दिव्यांग आणि परदेशातील भाविकांसाठी वरदान

या डिजिटल सुविधेमुळे वृद्ध भाविक, दिव्यांग नागरिक तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांनाही मंदिराचा अनुभव घरबसल्या घेणे शक्य होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धार्मिक स्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ प्रभावी ठरू शकते, असा विश्वास प्रकल्प विकसित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापनाचे सुनियोजन करण्यासही या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले.

‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘इम्पॅक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या मुंबई, कोची आणि दिल्ली येथे कार्यालये असलेल्या तंत्रज्ञान कंपनीने विकसित केला आहे. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान, जीआयएस नकाशांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण आणि अनुभवात्मक पर्यटन उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने ड्रोन फोटोग्रॅमेट्री, 360 अंशीय स्कॅनर आणि प्रगत त्रिमितीय रेंडरिंगच्या सहाय्याने मंदिराची सविस्तर डिजिटल प्रतिकृती तयार केली आहे.

या प्रकल्पाच्या कार्यसंघात चेन्नई येथील मिथुन आनंद, मुंबई येथील दीप्तीताई पाटील, वंश चिंदा आणि पुष्कर पुष्प यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, आशाताई महाले, ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, आर्टिस्ट समीर सांगळे यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens