ब्रेकिंग
पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर आमदार अनिल पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर नगरसेवकांसह उपस्थित

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहराचे अनेक वर्षांपासूनचे जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेली तब्बल *१९४.५४ कोटी रुपयांची पाडळसरे धरणावरील २४x७ पाणीपुरवठा योजना* आता वेगाने प्रगतिपथावर असून या महत्त्वाकांक्षी योजनेची रविवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

रविवार, दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह पाडळसरे धरण परिसराला भेट देत सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी ७:३० वाजताच आमदार अनिल पाटील यांचा ताफा पाडळसरे धरण परिसरात दाखल झाला.

विशेष म्हणजे, शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थिती लावत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहर विकासाच्या मुद्द्यावर आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.

पाडळसरे धरणाजवळ तापी नदीच्या काठी सुरू असलेल्या जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. शहरवासीयांना भविष्यात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अमळनेर शहरासाठी ही योजना ‘गेमचेंजर’ ठरणार असून, २४ तास अखंडित पाणीपुरवठ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येत केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात दिसू लागल्याचे चित्र या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *