विज्ञान प्रदर्शनात श्रीमती डी. आर. कन्या शाळेचे घवघवीत यश; तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ प्रकल्पाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
अमळनेर प्रतिनिधी : पंचायत समिती शिक्षण विभाग आणि भिका यशोद चौधरी माध्यमिक विद्यालय, शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अमळनेर येथील श्रीमती डी. आर. कन्या शाळेने घवघवीत यश संपादन केले. उच्च प्राथमिक गटात शाळेने सादर केलेल्या ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ या विषयावरील प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला असून, या प्रकल्पाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या प्रदर्शनात शाळेच्या कु. दिव्या परमेश्वर पाटील आणि कु. निधी जगदीश पाटील या विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ या विषयावर आधारित प्रकल्प प्रभावीपणे सादर केला. प्रकल्पाची मांडणी, विषयाचे सुस्पष्ट स्पष्टीकरण आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यांमुळे त्यांनी निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक प्रदान केला.
या यशस्वी विद्यार्थिनींचा उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम आणि गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यार्थिनींच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थिनींना शाळेच्या विज्ञान शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, शिक्षकेतर प्रतिनिधी शामभाऊ पवार, एस. एस. माळी, सौ. आर. एस. सोनवणे, विज्ञान शिक्षिका सौ. एस. एस. कसबे, किरण सनेर, सौ. बी. एस. पाटील, टी. एम. शेख, सौ. जे. पी. टुले, सौ. एम. एस. पाटील, सौ. टी. जी. पाटील आणि सतीश लांडगे यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा शाळेच्या वतीने देण्यात आल्या.

