अमळनेर-वावडे मार्गावर रिक्षा पलटी; प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेरहून वावडे येथे जाणारी प्रवासी रिक्षा ढेकू रोडवर पोलीस स्टेशनच्या पुढे पलटी झाल्याने झालेल्या अपघातात एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुरेखाबाई भिकन मैराळे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेरहून वावडे येथे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा ढेकू रोडवरील पोलीस स्टेशनच्या पुढे अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षातील सुरेखाबाई भिकन मैराळे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून संबंधितांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, रिक्षाचालकाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
या अपघाताची पुढील चौकशी सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

