अमळनेर अग्निशमन दलाची कामगिरी कौतुकास्पद; तीन घटनांमध्ये तत्पर सेवा… कचरा डेपोतील आग विझविण्यासाठी प्रयत्न; दोन गोऱ्यांना जीवदान देण्यात यश; अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरात गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अग्निशमन दलाने तत्परतेने मदतकार्य केल्याने नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. अंबऋषी टेकडी परिसरातील कचरा डेपोला लागलेली आग, तसेच गटारीत अडकलेल्या दोन गोऱ्यांची सुखरूप सुटका, अशा तीन घटनांमध्ये अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली.
अंबऋषी टेकडी परिसरातील कचरा डेपोला गुरुवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरातील झाडांनाही धोका निर्माण झाला होता. नरेश कांबळे यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी तातडीने अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना केली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने आवश्यक कार्यवाही केली.
दुसऱ्या घटनेत, गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता शहरातील एका गटारीत गोरा अडकल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित गोऱ्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर कुसुम भाटिया यांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती मिळाली.
तिसरी घटना लालबाग टाकीजवळ सकाळी सुमारे १०.०५ वाजता घडली. येथील गटारीत आणखी एक गोरा अडकला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य करत या गोऱ्यालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या सर्व कार्यात अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी कर्मचारी दिनेश बिर्हाडे, फारुक शेख ,जफर पठाण, सत्यम संदानशिव आनंद झिंबल,मच्छिंद्र चौधरी ,भिका संदानशिव विजय भोई, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर ,अजय बिर्हाडे,कमलेश पाटील ,कुंदन सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
शहरातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अग्निशमन दलाने वेळेवर प्रतिसाद देत आग नियंत्रण आणि मुक्या प्राण्यांच्या बचावासाठी कार्यवाही केली. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आणि सेवाभाव यामुळे नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

