ब्रेकिंग
समाजसेवेचा गौरवशाली सोहळा : लायन्स क्लब अमळनेरकडून डॉक्टर, सीए आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा भव्य सत्कार

 

अमळनेर | प्रतिनिधी

समाजसेवा, वैद्यकीय, आर्थिक तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या मान्यवरांचा लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात भव्य गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रगतशील शेतकरी बांधवांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब अमळनेरचे अध्यक्ष जितेंद्र पारख होते. यावेळी सचिव जयेश गुजराथी, खजिनदार कुमारपाल कोठारी यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाप्रती असलेली निष्ठा, सेवाभाव आणि विविध क्षेत्रांतील सातत्यपूर्ण योगदानामुळेच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य होत असल्याचे प्रतिपादन केले. सन्मानित व्यक्तींचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रमांना सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. संदीप जोशी, डॉ. मिलिंद नवसारिका, डॉ. नरेंद्र महाजन, डॉ. किशोर शाह, डॉ. युसुफ पटेल, डॉ. बी. आर. बाविस्कर, डॉ. रवींद्र जैन, डॉ. निखिल बहुगुणा, सीए राजेश शाह, सीए अजय हिंदुजा, सीए रुपेश मकवाणा तसेच प्रगतशील शेतकरी एच. डी. भरुचा, सुशील जैन, योगेश मुंदडा, सुनील चौधरी, प्रितेश पारख, जितेंद्र जैन आणि दिनेश मणियार यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी केले. सूत्रसंचालन अजय हिंदुजा यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव जयेश गुजराथी यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर शाह, अजय हिंदुजा आणि योगेश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करत समाजहितासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *