ब्रेकिंग
“एक पेड माँ के नाम” उपक्रमातून हरित अमळनेरचा संकल्प; रोटरी क्लबच्या वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमळनेर | प्रतिनिधी

वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत रोटरी क्लब अमळनेर यांच्या पुढाकाराने “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण अभियान २०२६ मोठ्या उत्साहात पार पडले. वृक्षसंवर्धन, हरित अमळनेर आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रोटरी क्लब अमळनेर, अमळनेर नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट अमळनेर, पर्यावरण सखी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रो. अजयभाऊ केले यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील आणि वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत हरित भविष्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी रो. अजय केले यांच्या धर्मपत्नी सौ. विनिता अजय केले यांच्या वाढदिवसानिमित्त केकऐवजी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे डॉक्टर शिबी वशिष्ठ यांनी आपल्या सुप्रसिद्ध “भाग्यश्री” या शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वृक्षांच्या संगोपनासाठी भेट दिले. हे सेंद्रिय खत वृक्षांची वाढ अधिक जोमदार व निरोगी होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी “एक पेड माँ के नाम” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केले आणि रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या अभियानात विवेक देशमुख, अजय रोडगे, कीर्तिकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया!” हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *