स्वप्नील पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 6 hours ago
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी कन्या हायस्कूलची गायत्री बोरसे प्रथम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ४ × ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण, तर ४ × १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाची कमाई
अमळनेर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत पिंपळे बु. येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. खेळाडूंनी ४ × ४०० मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली. या यशाच्या जोरावर संघातील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात १७ वर्षांखालील मुलांच्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट वेग, समन्वय, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशस्वी रिले संघात प्यारसिंग टिंका पावरा, राजकिरण अमाश्या पावरा, सवित सिताराम पावरा, रोहन खुशाल पावरा आणि पवन सायसिंग पावरा या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंची आगामी ३ नोव्हेंबर रोजी बोईसर, ता. जि. पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंना उच्च माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक तथा क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून सतीश कागणे यांनी जबाबदारी सांभाळली.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई पाटील, संस्थेचे सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील, संचालक ॲड. अभिजीत पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
विभागीय स्तरावर यशाची मोहोर उमटविल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी हे खेळाडू सज्ज झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

स्वप्नील पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड

अमळनेर : येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांची जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राकेश पाटील, प्रसन्ना बोरोले, आशिष पवार, अविनाश घुगे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
स्वप्नील पाटील यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल साने गुरुजी विद्या मंदिर येथे तसेच अमळनेर शहरातील भगवा चौकात त्यांचे उत्साहात अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमळनेरात पुन्हा नाट्यसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न,,पण अमळनेरकरांचा प्रतिसाद आवश्यक अनेक वर्षांनंतर नाट्यगृहात ‘वेगळं असं काहीतरी’चे १ नोव्हेंबरला होणार सादरीकरण
अमळनेर :-एकेकाळी अमळनेर शहर म्हणजे नाट्य रसिकांची भूमी म्हणून ओळख असताना काळाच्या ओघात नियमित होणारी नाट्यश्रुखला खंडित झाल्याने शौकीन रसिकांना धुळे व जळगावची वाट धरावी लागत होती मात्र जळगावातील श्री एन्टरटेन्मेंट व धुळे येथील रंगदेवता थिएटर्स यांनी अमळनेरकर रसिकांची ही तहान भागविण्यासाठी मोठे धाडस दाखवीत एक दर्जेदार नाटक आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यानिमित्ताने साहित्य, कला आणि नाट्यसंस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या अमळनेर शहरात व्यावसायिक नाटकांची चळवळ पुन्हा बळकट होणार आहे.सदर नाट्य संस्थेकडून रविवार, १ नोव्हेंबर रोजी ‘वेगळं असं काहीतरी’ या दोन अंकी कौटुंबिक व मनोरंजक नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रात्री ८ वाजता या प्रयोगाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल.
दरम्यान अमळनेर शहरात दिवंगत उद्योगपती स्वर्गीय आर के दादा पाटील यांनी त्याकाळी नवरात्र उत्सव तथा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक दर्जेदार नाटक अमळनेरात आणून मोठी मेजवानी अमळनेराना दिली.त्यानंतर माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील यांनी देखील नाटक तथा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून ही परंपरा टिकवून ठेवली मात्र दरम्यानच्या काळात नाटक येण्याची परंपरा खंडित झाली.काही महिन्यांपूर्वी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व वरुण राजेश पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीला धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे महानाट्य अमळनेरात आणून रसिकांचे मन जिंकले.
नाटकांची ओढ वाढली असताना अमळनेरमधील नाट्यरसिकांना दर्जेदार मराठी नाटकाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, धुळे व जळगाव यासारख्या शहरात जावे लागते. मात्र, आता व्यावसायिक नाटके, फोक कार्यक्रम आणि नामवंत कलाकारांचे कार्यक्रम थेट अमळनेरमध्ये आणण्याचा प्रयत्न श्री एन्टरटेन्मेंट व रंगदेवता थिएटर्सकडून केला जात आहे. शहरातील समृद्ध नाट्यपरंपरेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नाट्यसंस्कृती टिकविण्यासाठी केवळ प्रयोगांचे आयोजन पुरेसे नसून रसिक प्रेक्षकांची उपस्थिती आणि प्रतिसादही महत्त्वाचा आहे. त्यामुळे अमळनेरकरांनी सहकुटुंब नाट्यगृहात उपस्थित राहावे आणि या सांस्कृतिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाट्यप्रयोगासाठी भटू चौधरी (मो. : ७०२००५२३३८), विक्रम पाटील (मो. : ९८९२०३०१०४) व चंद्रशेखर पाटील (मो. : ९६६५३२५५५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


