ब्रेकिंग
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांनी हिंदी सप्ताह उत्साहात साजरा

 

अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये हिंदी दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण सप्ताह विविध शैक्षणिक उपक्रम व स्पर्धांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार तसेच विद्यार्थिनींमध्ये हिंदी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हिंदी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

हिंदी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी दिनांक २१ सप्टेंबर २०२६, सोमवार रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माननीय श्री. दादासाहेब संदीप घोरपडे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. “तुम्ही या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थाने हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करत आहात आणि हिंदी भाषेचा गौरव वाढवत आहात,” असे त्यांनी सांगितले.

वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनींनी हिंदी भाषेतील आपले प्रभावी वक्तृत्व सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेत प्रथम क्रमांक – कल्याणी पाटील (१० वी-अ), द्वितीय क्रमांक – दिव्यानी पाटील (१० वी-अ), तृतीय क्रमांक – पूजा पाटील (१० वी-अ) तर उत्तेजनार्थ – अक्षरा साळुंखे (८ वी-अ) यांनी यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

याच कार्यक्रमात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दृष्टी चौधरी हिचाही अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दृष्टी चौधरी हिला श्री. मुकेश पाटील सर व श्री. आर. एम. देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव दादासाहेब श्री. संदीप घोरपडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, “तुम्ही प्रत्येक भाषा शिका आणि ती समजून घ्या. भाषा शिकल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होत असते,” असे प्रतिपादन केले. हिंदी सप्ताहादरम्यान संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनी तसेच हिंदी शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. “खऱ्या अर्थाने तुम्ही हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करत आहात,” असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब श्री. हेमकांत पाटील तसेच संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण हिंदी सप्ताहाचे आयोजन हिंदी शिक्षक श्री. दिलीप पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप पाटील सर यांनी केले, तर श्री. मुकेश पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग, विविध स्पर्धांमधून दिसून आलेले त्यांचे भाषिक कौशल्य आणि हिंदी भाषेविषयी निर्माण झालेली आस्था यामुळे साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये साजरा झालेला हिंदी सप्ताह संस्मरणीय ठरला.

अमळनेर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १२० मल्लांचा सहभाग कुस्तीच्या आखाड्यात रंगला चुरशीचा थरार; विजयी मल्लांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा

 

अमळनेर : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय अमळनेर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा तालुका क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कुस्तीच्या आखाड्यात विविध शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील मल्लांनी आपले डावपेच आणि ताकद पणाला लावत चुरशीची लढत दिल्याने स्पर्धेत कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळाला.

अमळनेर तालुक्यातील विविध शाळा तसेच ज्युनिअर कॉलेजमधील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली अशा एकूण १२० मल्लांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक कुस्तीमध्ये मल्लांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत विजयासाठी जोरदार झुंज दिली.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अमळनेर पोलीस विभागाच्या पीएसआय कविता ठाणगे मॅडम प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर कुस्ती महासंघाचे श्री. बाळू भाऊ पाटील, माजी नगरसेवक श्री. प्रताप आबा पाटील, दामिनी पोलीस विभाग प्रमुख नम्रता जरे मॅडम, श्री. संजय पाटील भुतबापु, श्री. संजय भिला पाटील पैलवान, क्रीडा अध्यक्ष श्री. एस. पी. वाघ यांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून तसेच श्रीफळ फोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मल्लांना शुभेच्छा देत खेळाडूंनी शिस्त, मेहनत, जिद्द आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.

स्पर्धेतील कुस्त्यांचे पंच म्हणून श्री. महेश माळी यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच समितीचे सदस्य श्री. के. आर. बाविस्कर, प्रा. प्रितेश तुरणकर, श्री. बापूराव सांगोरे, आर. ए. घुगे, श्री. स्वप्नील पाटील, श्री. गोकुळ बोरसे यांनी स्पर्धेचे नियोजन व आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

या प्रसंगी श्री. एच. आर. बाविस्कर सर, श्री. अरविंद मोरे सर, श्री. रविंद्र भोई, श्री. योगराज चौधरी, श्री. पवन शिंपी, श्री. भावेश कोळी यांचीही उपस्थिती होती.

तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विजयी ठरलेल्या अमळनेर तालुक्यातील सर्व पहेलवानांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

एकूण १२० मल्लांचा सहभाग, आखाड्यातील चुरशीच्या लढती आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे अमळनेर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

 

अमळनेर : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी प्राध्यापक डॉ. सुनंदा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरातील जी. एस. हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण तसेच वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्याथी प्रतीक्षा पाटील,निकिता पाटील,रुचिका पाटील,नेहा पाटील,नूतन पाटील,सोनल पाटील,प्रज्ञा पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या प्रसंगी जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विनोद कदम तसेच शिक्षक आर जे पाटील उपस्थित होते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा श्री मंगळग्रह मंदिरात जमला भक्तीचा सागर; धार्मिक विधींमुळे दिवसभर चैतन्य

‌

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेला ‌‘मंगल‌’ महाजागर भाविकांनी दिवसभर अनुभवल्याचे पाहावयास मिळाले. निमित्त होते मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याचे. श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असलेल्या श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अलौकिक श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात भक्तिभावाने विधीवत साजरा झाला. 

पहाटे ४ वाजता श्री मंगळ सोहळ्याचे विशेष मानकरी जिल्हाधिकारी मा. श्री. रोहनजी घुगे यांच्या शुभ हस्ते श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात झाली. सकाळी ६ वाजता दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी परिवारासह वाद्यवृंदाच्या गजरात नवे ध्वज मंदिरात आणले. जिल्हाधिकारी श्री. घुगे व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, फुलराणी ग्रुपच्या महिला भगिनी, व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी, मंगल सेवेकरी सौ. आशाताई महाले, प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, ए. डी. भदाणे, पुषंद ढाके, आशिष चौधरी यांच्यासह सेवेकऱ्यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. श्री. घुगे यांनी ध्वजाचे व ध्वजाचे मानकरी असलेल्या पांडव दाम्पत्याचे औक्षण केले. याप्रसंगी संबळ वादन आणि भेरच्या आवाजाने परिसरात मंगलमय वातावरण निर्मिती झाली. साडेसहाच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर सामूहिकरित्या देवांचा पाळणा म्हटला गेला. ७ वाजता ध्वजपूजन होऊन विधीवतरित्या कळसावरील व मुख्य प्रवेशद्वारावरील जुने ध्वज उतरवून नवे ध्वज तेथे लावण्यात आले. माजी सैनिक असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजाला मानवंदना दिली. ८ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन ८.३० वाजता संभाजीनगर येथील किशोर व श्रीकांत या उपाध्याय बंधूंनी देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे उपस्थित होते. उपस्थित सर्वच भाविकांनी दिवसभर श्री मंगळग्रह देवांचा पाळणा हलवत दर्शनाचा पुण्यलाभ घेतला. त्यानंतर पुण्यातील वेंकीज कंपनीतर्फे भाविकांना मोतीचूर लाडूंचा प्रसाद वाटप सुरू झाले, ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले. 

५६ फळांचा भोग

अमळनेर येथील निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मीक पाटील यांनी श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह देवांना देशी-विदेशी ५६ फळांचा भोग अर्पण केला. यामध्ये आंबा, पपई, जांभूळ, केळी, कलिंगड, बोर, सफरचंद, खरबूज, चक्री लिंबू (ग्रेपफ्रूट), संत्री, चिकू, म्हाळुंग, मोसंबी, अननस, कागदी लिंबू, द्राक्ष, नारळ, लिंबू , पेरू, सीताफळ, फणस, डाळिंब, रामफळ, हनुमानफळ (ग्रॅव्हिओला), आवळा, पिस्ता, आटकी (शहतूत, तुती), करवंद, अंजीर (ड्राय), अळूचाळू (प्लम), चिंच, खजूर, आडू (पीच), अंजीर, स्ट्रॉबेरी, जर्दाळू (ॲप्रिकॉट), अळू, ब्ल्यूबेरी, चेरी, काजू (काजूबोफ्लड), रॅस्पबेरी, किवी, आक्रोड, ब्लॅकबेरी, ड्रॅगनफ्रूट, बदाम, क्रेनबेरी, पॅशनफ्रूट, एवोकॅडो, लिची, बेल (बेलफळ), स्टारफ्रूट (करमळ), मंगोस्टीन, कवळ, उंबर, शेवगा (रायआवळा) या देशी-विदेशी फळांचा समावेश होता. दरवर्षी विविध खाद्यपदार्थांचा देवाला ५६ भोगाचा नैवेद्य दिला जातो. मात्र, यावर्षी यासोबतच ५६ विविध फळांचाही नैवेद्य देण्याची सुप्रथा सुरू झाली.

देशी-विदेशी फुलांची मयूरपंखी मनमोहक सजावट

श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिराच्या ओट्यावर सजविण्यात आलेल्या पाळण्याच्या अवतीभोवती देशी-विदेशी फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. यात ऑर्किड, सन्स फ्लॉवर्स, जर्बिरा, गुलाब पिचकलर, टचगुलाब, चायनीज गुलाब, गॅलडो काडी सात प्रकारची, ३ प्रकारची शेवंती, निषिगंधा, जिप्सी, निलियम, लिली, कॅला लिली, झेंडू शेवंती, आस्टर, कामिनी, डिशनरी, सोफ्लगाफूल, कटपत्ता, सूर्यपत्ता, पामपत्ता, ट्यूलीप, नंदनवन पक्षी, डॅफोडिल्स, अंथरियम, चॉकलेट कॉसमॉस आदी फुलांच्या माध्यमातून करण्यात आलेली मयूरपंखी सजावट भाविकांचे आकर्षण बनली होती.

श्री मंगळ जन्मोत्सव लाइव्ह

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित सर्व धार्मिक विधींचे दिवसभर जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंगल तंत्रज्ञ आशिष चौधरी यांनी या धार्मिक विधींचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील भाविकांना घरी बसून थेट प्रक्षेपण घडविले.  

आधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न 

 

अमळनेर : व्होल्कर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या सहाय्याने आधार संस्था अमळनेर शहरालगच्या वस्त्यांमध्ये आधार आरोग्य प्रकल्प ची नुकती सुरुवात झाली असून प्रकल्पांतर्गत कार्यरत आरोग्य मित्र व ज्यांच्या सहभागातून प्रकल्प कार्यान्वित होणार आहे त्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, ए एन एम यांच्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माता बाल आरोग्य विषयी सविस्तर माहिती देण्यात आली ज्यात गरोदरपणात घ्यावयाची काळजी, 

गरोदरपणात करावयाचा तपासण्या , बाळंतपणानंतरची चाळीस दिवस, जोखमीच्या गरोदर माता लक्षणे आणि व्यवस्थापन, यावर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रशिक्षक, साधन व्यक्ती डॉ. आम्रपाली मुरार व ज्ञानेश्वर सोनवणे जपाईगो त्यांनी घेतले. 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, यांनी प्रास्ताविक आणि प्रशिक्षणाची उपयुक्तता सांगितले,कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांची उपस्थिती होती.

 पूर्वी चौधरी, मुरलीधर बिरारी, दीपक संदानशिव, आनंद पगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक दीप्ती गायकवाड यांनी केले तर आभार ज्योती कोळी यांनी व्यक्त केले.

दीप्ती गायकवाड 

प्रकल्प समन्वयक

लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 

अमळनेर : लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने श्री गणेशोत्सवानिमित्त दिनांक *१८ सप्टेंबर २०२६* रोजी भगिनी मंडळ विद्यालय, अमळनेर येथे विद्यार्थ्यांसाठी *रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे *७०० विद्यार्थ्यांनी* या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

इयत्ता १ ली ते ३ रीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, तर इयत्ता ४ थी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन करत विविध रंगसंगती व कल्पक चित्रांद्वारे आपली सर्जनशीलता व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोन, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.

या कार्यक्रमास *लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे अध्यक्ष Ln. जितेंद्रभाऊ पारख*, *सचिव Prof. Dr. जयेश गुजराथी*, तसेच ज्येष्ठ लायन सदस्य *Ln. Dr. रवींद्र कुलकर्णी*, *Ln. रवींद्रसिंग कालरा*, *Ln. योगेश मुंदडा*, *Ln. विनोद अग्रवाल*, *Ln. प्रदीप अग्रवाल* यांच्यासह लायन्स क्लबचे इतर सर्व सदस्य उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आणि उत्साह यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. *विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा प्रयत्न आहे*.

ZRUCC बैठकीत खानदेशच्या रेल्वे प्रश्नांची दमदार मांडणी ▪️प्रवाशांच्या समस्या, प्रलंबित मागण्या व रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रतिक जैन यांचा ठाम आवाज

 

धरणगाव / अमळनेर 

धरणगाव : मुंबई येथे पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत खानदेशातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह रेल्वे सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या मागण्यांची प्रभावी व ठामपणे मांडणी करण्यात आली. झेडआरयुसीसी सदस्य प्रतिक विरचंद जैन यांनी खानदेशातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी, रेल्वे सेवांबाबतच्या अपेक्षा तसेच प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. मुंबई येथे झालेल्या या बैठकीस पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसेच झेड.आर.यु.सी.सी. सदस्य उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून खानदेशातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर थेट व्यासपीठ मिळाले. खानदेश हा रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी तसेच विविध कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी रेल्वे सेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, गाड्यांना थांबे, वेळापत्रकातील सुधारणा, प्रलंबित मागण्यांची पूर्तता तसेच स्थानकांवरील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. खानदेशातील रेल्वे प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न राहता ते रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने केले जात आहे, अशी भूमिका प्रतिक जैन यांनी मांडली. प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत व्यासपीठाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समितीच्या माध्यमातून प्रवाशांच्या समस्या थेट रेल्वे प्रशासनासमोर मांडता येत असल्याने खानदेशातील विविध रेल्वे प्रश्नांना भविष्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा खानदेशातील रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. खानदेशातील प्रवाशांचा आवाज रेल्वेच्या व्यासपीठावर सातत्याने बुलंद करण्याचा प्रयत्न राहील, असा निर्धार श्री. जैन यांनी व्यक्त केला.

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, ५६ भोग आणि श्री महाभोमयागाचे आयोजन; भाविकांना दर्शन, तीर्थप्रसादाचे निमंत्रण

 

अमळनेर : श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असलेल्या येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विधीवत साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी या अलौकिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंदिराच्या इतिहासात हा दिवस सर्वांत मोठा आणि परम पवित्र मानला जातो. यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात अतिशय भक्तिमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण असणार आहे.

दिवसभरातील कार्यक्रम

पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात होईल. सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा होईल. सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज विधीवत उतरवून नवे ध्वज लावण्यात येतील. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला जाईल. यानंतर दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचेही आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदासह वाजतगाजत पालखी मिरवणूक निघेल. त्यानंतर ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाधुपारती होईल. 

भाविकांना आवाहन

श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.

काय आहे मंदिराचे वेगळेपण?

खानदेशची भूमी गौरवान्वित करणारे हे मंदिर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील एकमेव मूर्ती आणि पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आहे. तसेच परिसरात भगवान श्री गुरुदत्त-माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित आणि भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित विश्वातील एकमात्र मंदिर आहे.

जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा व ताततीने दुष्काळी सवलती व मदत देण्याबाबत निवेदन सादर…

 

जळगांव : जळगांव जिल्ह्यातील यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पावसातील खंड, पावसाचे अनियमित स्वरूप व सततची उष्णता यामुळे जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भांगामध्ये पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून खरीप पिकांची वाढ खुंटलेली आहे. शेतक-यांनी बियाणे, खते औषधे व मशागतीसाठी मोठा खर्च केलेला असताना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून जनावरांच्या चा-याबरोवर पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.

 

जळगांव जिल्ह्यातील सद्यस्थितीचा विचार करता प्रशासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी व पंचनामे करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतक-यांसाठी तातडीने मदत व सवलती देण्यात याव्यात ही नम्र विनंती.

 

प्रमुख मागण्या

 

१) जळगांव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा.

 

२ ) जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना हेक्टरी ५००००/- रूपये नुकसान भरपाई मिळावी.

 

३) पात्र शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबधीत विमा कंपनीने तातडीने कार्यवाही करावी.

 

४) पावसाअभावी निर्माण होणारी जनावरांच्या चा-याची समस्या लक्षात घेऊन चारा उपलब्ध करून देण्यात यावा.

 

५) शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या सर्व सवलती व योजनांचा लाभ तातडीने देण्यात यावा.

 

६) शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ उर्वरीत यादी जाहीर करून शेतक-यांचा खात्यावर पैसे जमा करावे.

 

७) मागील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने झालेला नुकसानाचे पैसे तात्काळ शेतक-यांना दयावे.

 

८ ) शेतक-यांचा मुलांना फी माफी व एस. टी. पास सवलत देण्यात यावी.

 

९) नियमित कर्मफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्यावे.

 

जळगांव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शासनाकडे योग्य तो प्रस्ताव पाठवावा ही नम्र विनंती. 

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिलीप खोडपे सर, विकास पवार, वाय एस महाजन सर, ईजाज मलिक, कल्पिताताई पाटील, सुनिल भैय्या माळी, विलास पाटील, डॉ सुभाष देशमुख, किरणभाऊ राजपूत, अन्वर खाटीक, राजु मोरे, गणेश पाटील, भगवान सोनवणे, मजहरभाई पठाण, रईस खाटीक, प्रा एन डी पाटील, विनायक पाटील, प्रतिभाताई शिरसाट, सुमनताई बनसोडे, माधुरीताई पाटील, कलाताई शिरसाट, नारायण चौधरी, प्रा गोपाल पाचवणे, नईम खाटीक, संजय जाधव, दिलीप ताकवाले, वाल्मिक आमले, अकबर खान अजमिरी खान, लक्ष्मणराव पाटील, रियाज देशमुख, मोहित पवार, राजेंद्र चौधरी, फहरान खान इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका,मात्र सतर्क राहा  आमदार अनिल पाटील यांचे जनतेला आवाहन

 

अमळनेर : अमळनेर तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून दोन-तीन ठिकाणी बिबट्या आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः नंदगाव शिवारात एकावर हल्ला आणि परिसरातील शेतशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आणि अंतुर्ली परिसरात डोळे चमकणारा प्राणी दिसल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

      याशिवाय ढेकू रस्ता येथेही बकऱ्या चारणाऱ्याला दिसल्याची वार्ता पसरली.तसेच कालही पिळोदा ,धुपी ,देवळी शिवारात बिबट्याचा वावर आढळून पपईच्या शेतात तो लपला व त्यांनतर पळाला नंतर मक्याच्या शेतात दिसला,अशी वार्ता पसरल्याने शेतकरी भयभीत होऊन मजूरही घाबरलेले होते,.याठिकाणी देखील वन अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल होऊन सर्वत्र पाहणी केली.

       या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांचेशी संपर्क साधून संपुर्ण माहिती जाणून घेत त्यांना अधिक दक्ष होण्याच्या सूचना केल्या आहेत.तसेच जनतेला महत्त्वाचे आवाहनही केले आहे.

 

काय म्हणाले आमदार अनिल पाटील ?

 

     “अमळनेर तालुक्यात बिबट्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांनी ही बाब केवळ अफवा समजून बेसावध राहू नये, तसेच विनाकारण पॅनिक होऊन घाबरूनही जाऊ नये.सर्व नागरिकांनी, विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे. शेतात जाताना सोबत २-३ जणांनी जावे, हातात बॅटरी, काठी ठेवावी. लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये. आपली व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.”

 

वन विभाग सतर्क, दोन पिंजरे लावले

 

       आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाला सतर्क करण्यात आले आहे. वन विभागाने तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावले असून पिंजऱ्यात सावज म्हणून बकरी कोंडण्यात आली आहे.मात्र रात्री-अपरात्री शेतरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे आणि वर्दळीमुळे तो हिंस्त्र प्राणी पिंजऱ्याजवळ येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

         “मी स्वतः वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. वन विभागाचे पथक गस्त घालत आहे. लवकरात लवकर बिबट्याचा वावर असेलच तर त्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा दिला जाईल. नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि काही संशयास्पद दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.