अखेर अमळनेर न्यायालयाने घेतला मोकळा श्वास न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने काढले अतिक्रमण
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 10 hours ago
पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श! धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले उत्तरकार्य; दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, उपस्थितांना ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव : वैयक्तिक दुःखालाही समाजजागृतीची दिशा देत धरणगावातील वाघ परिवाराने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते रमेश व सतिष जगन्नाथ वाघ यांची पुतणी आणि ललिता व आबासाहेब राजेंद्र वाघ यांची कन्या दिवंगत श्रद्धा (ताऊ) हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा संपूर्ण विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फाटा देत विवेक, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची धरणगावसह परिसरात मोठी चर्चा होत असून, विविध स्तरांतून वाघ परिवाराच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणत साधेपणा, विवेक आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित विधी संपन्न केला. कोणत्याही अनिष्ट चालीरीती, कर्मकांडशिवाय पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांवर सकारात्मक ठसा उमटविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सचिव आर डी महाजन यांनी केले. तद्नंतर सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ” महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी दिलेला समता, शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा वारसा जपणे ही आजच्या समाजाची गरज आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडापेक्षा मानवसेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन हाच खरा धर्म आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सत्यशोधक विचार स्वीकारले पाहिजेत.”
यावेळी आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी आपल्या दिवंगत कन्या श्रद्धाच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याची घोषणा केली. त्यांच्या या समाजहिताच्या निर्णयाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचा हा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.
पुरोगामी चळवळीचे नेते तुळशीराम बापू आणि भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ खंडू वाघ यांच्या परिवाराने अनेक वर्षांपासून पुरोगामी, परिवर्तनवादी आणि सत्यशोधक विचारांची परंपरा जपली असून, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” ह्या उक्तीनुसार वाघ परिवाराचे निरंतर कार्य असून, श्रद्धाच्या स्मृतीतून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असल्याचे सांगत ॲड. महाजन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे उपस्थित सर्वांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या विचारप्रवर्तक १०० ग्रंथाचे मोफत वितरण करण्यात आले. वाचनसंस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन, ॲड. व्ही.एस.भोलाणे, शिवसेना नेते पी. एम. पाटील, नगरसेवक विनय भावे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, भूषण धनगर, महेंद्र तायडे, भरत शिरसाठ, गुलाब महाजन, हरी महाजन, महेंद्र महाजन, राहुल रोकडे, रामकृष्ण चौधरी, गोरख देशमुख, हेमंत माळी, कविराज पाटील, प्रल्हाद महाजन, दिनेश महाजन, मयुर भामरे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीतून समाजसेवा, विवेकवाद, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम न ठरता समाजाला नवी दिशा देणारा आणि परिवर्तनवादी विचारांना बळ देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


अखेर अमळनेर न्यायालयाने घेतला मोकळा श्वास न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने काढले अतिक्रमण
अमळनेर :- येथील न्यायालयाच्या आवाराबाहेरील अतिक्रमण नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले होते त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयाच्या परिसरातील अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले असून या कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
न्यायालयाच्या बाहेर आणि परिसरात टपरीधारक, डिजिटल बॅनर, कपडे, बूट चप्पल विक्रेते, पाणीपुरी वाले इत्यादींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले होते ज्याला वाटेल तो न्यायालयाच्या बाहेर व्यवसाय थाटत होता त्यामुळे या परिसरात वादही होत असत तसेच तेथे येणाऱ्या ग्राहकांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती.
अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयाबाहेरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. जून महिन्यात दिवाणी न्यायाधीशांनी पालिकेला पत्र देऊनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छा. वा. पाटील यांनी नगरपालिकेला पत्र दिले आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अतिक्रमण विभागाला आदेश दिले. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, संजय बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, राम राम राजे, विशाल सपकाळे, दर्शन बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढले.
*नगरसेवकांचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न अयशस्वी*
अतिक्रमण काढताना काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून अतिक्रमण विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाचा आदेश पाहून त्यांना तोंडघशी पडावे लागले. शहरातील काही प्रभागांमध्ये नगरसेवकच स्वतः अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देत असून मन मानेल त्या ठिकाणी टपऱ्या, हातगाड्या लावल्या जात आहेत त्यामुळे नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागावर दबाव न टाकता शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून रु. ७५ लाख १८ हजारांचे (५० टक्के) अनुदान उपलब्ध होणार असून, उर्वरित निधी बाजार समितीकडून उभारला जाणार आहे.
राज्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासन निर्णयानुसार मंजूर झालेल्या एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदानाची रक्कम दोन समान हप्त्यांत वितरित करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्या मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जातील. बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच शेतकरी भवनाचा देखभाल-दुरुस्ती खर्च, वीज, पाणी, मनुष्यबळ व इतर सर्व खर्च संबंधित बाजार समितीनेच उचलायचा असून, त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी मिळणार नाही.
या शेतकरी भवनासोबत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना’ देखील राबविण्यात येणार आहे. शासनाकडून प्रति भोजन ४० रुपयांचे अनुदान मिळणार असून, बाजार समितीच्या सहभागातून शेतकऱ्यांना केवळ नाममात्र ५ रुपयांत भोजन उपलब्ध होणार आहे. याशिवाय शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी पुरुष, महिला तसेच हमाल-मापाडी यांच्यासाठी मुक्काम, विश्रांती आणि आवश्यक मूलभूत सुविधांचीही व्यवस्था या भवनात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये अमळनेरचा समावेश झाला आहे. पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या विशेष सहकार्यामुळे तसेच खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
याबाबत समाधान व्यक्त करताना अशोक आधार पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांनी सांगितले की, *”सातत्यपूर्ण तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या दीड कोटींच्या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुक्काम, विश्रांती, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. या कामासाठी पणन मंत्री ना. जयकुमार रावल, खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”
या प्रकल्पाबद्दल सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील तसेच संचालक मंडळाने महाराष्ट्र शासनाचे आभार मानले असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी शेतकरी भवनाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read More अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर


