जैन साध्वींच्या मृत्यू प्रकरणाने संतापाची लाट अमळनेरातील समस्त जैन समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर
प्रतिनिधी | अमळनेर
मध्यप्रदेशातील रिवा येथे दोन जैन आर्थिका माताजींच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर देशभरातील जैन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, अमळनेर येथील समस्त जैन समाजही आक्रमक झाला आहे. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच साधू-संतांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, या मागण्यांसाठी अमळनेर जैन समाजातर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिवा जिल्ह्यात २० मे रोजी सकाळच्या सुमारास पायी विहार करत असताना *१०५ आर्थिका श्रुतमणी माताजी* आणि *१०५ आर्थिका उपशम माताजी* यांना भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण घटनेत एका माताजींचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या माताजींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाज हळहळ व्यक्त करत असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा केवळ अपघात नसून हेतुपुरस्सर घडवून आणलेला प्रकार असू शकतो, असा गंभीर संशय समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही विविध ठिकाणी साधू-संतांवर घडलेल्या घटनांमुळे समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जैन समाजाने शासनाला या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी साधू-संतांच्या सुरक्षेबाबत ठोस आणि प्रभावी धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य व केंद्र शासनाने या प्रकरणात संवेदनशीलता दाखवत न्याय द्यावा, अशी अपेक्षाही समाजबांधवांनी व्यक्त केली.

या वेळी जैन समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, संघपती, समाजबांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात निषेधाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समाजबांधवांकडून देण्यात आला आहे.
