ब्रेकिंग
जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर सलग दुसऱ्यांदा मानाचा बहुमान; जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

प्रतिनिधी | जळगाव

देशातील संसदेतील उल्लेखनीय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी कामगिरीसाठी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा *‘संसद रत्न पुरस्कार २०२६’* जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावत त्यांनी जळगाव जिल्ह्याचा गौरव देशपातळीवर उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियंदर्शिनी राहुल यांनी पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले की, २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत खासदारांच्या संसदीय कामगिरीचा सखोल अभ्यास करून ज्युरी समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, विविध चर्चांमधील प्रभावी मांडणी, लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा, विकासाभिमुख भूमिका आणि संसदेतील शिस्तबद्ध उपस्थिती या महत्त्वपूर्ण निकषांवर खासदार स्मिताताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संसदेमध्ये अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भूमिका मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा हा पुरस्कार देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो.

यंदाच्या *‘संसद रत्न पुरस्कार २०२६’* मध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळाले आहे. राज्यातील पाच खासदारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, हेमंत सावरा, स्मिता वाघ तसेच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्यनिष्ठा, जनतेशी असलेली बांधिलकी आणि विकासकामांबाबतच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विविध स्तरांतून विशेष कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *