श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांच्या बदनामीप्रकरणी अनंत निकमविरोधात तक्रारी
अमळनेर : श्री मंगळग्रह मंदिर व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत अनंत रमेश निकम यांच्याविरोधात पोलिस व प्रशासनाकडे अनेक सामूहिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
डॉ. डिगंबर महाले यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, न्यायालयाच्या निकालाची चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून मंदिर व त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे. तसेच मंगळवार, दि. १४ जुलै रोजी धर्मदाय विभागाकडेही पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सोमवारी सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्ववादी संघटना, मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व व्यावसायिक तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या अमळनेर शाखेने प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्वतंत्र निवेदने सादर करून अनंत निकम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
तक्रारदारांच्या मते, सोशल मीडियावरील पोस्ट व व्हिडिओंद्वारे न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी करण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


