ब्रेकिंग
नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजानेला तिलोत्तमाताई यांच्याकडून स्कूल बसची भेट; तसेच सरपंच सचिन पाटील यांच्याकडून ₹५० हजारांची देणगी

 

अंतुर्ली-रंजाने (ता. अमळनेर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाने शाळेला संस्थेच्या अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्या वतीने स्कूल बस भेट देण्यात आली. तसेच गावाचे सरपंच सचिन पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी ₹५० हजार रुपयांची रोख देणगी जाहीर करून शिक्षणाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

 अंतुरली रंजाने परिसरासह आसपासच्या भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी चालत यावे लागत होते, तर काहींना नियमित शाळेत उपस्थित राहणे कठीण होत होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळेला स्कूल बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढण्यास मदत होणार असून शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्कूल बस भेटीमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे गावाचे सरपंच सचिन पाटील यांनी यावेळी शाळेला ₹५० हजारांची रोख मदत देत शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ दिले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थ, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सचिव रवींद्र पाटील, सरपंच सचिन पाटील, संदीप धोबी, प्रदीप पाटील मुख्याध्यापक सुभाष पाटील, संजय भगतसिंग पाटील, महेंद्रचव्हाण, संदीप उघडे, जी. बी. पाटील, एम. आर. पाटील, बैसाणे मॅडम, साळुंखे मॅडम, नानाभाऊ, संजय पाटील, भगवान पाटील, वैशाली पाटील, भगवती पाटील, हितेश बडगुजर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही स्कूल बस आणि शाळेला मिळालेली आर्थिक मदत ही निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असून, अंतुर्ली-रंजाने परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *