ब्रेकिंग
विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेरचे आध्यात्मिक वैभव आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आता शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने आणि राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने मंदिराचे भव्य-दिव्य नवनिर्माण करण्यात येईल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी मंदिर परिसराच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.

मंदिराला भेट दिल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी थेट भडगाव येथे वारीमध्ये सहभागी होत परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची भेट घेतली. यावेळी मंदिराच्या पुनर्बांधणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मंदिराचे विश्वस्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्रद्धास्थानाचे वैभव पूर्ववत करण्यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर पाठपुरावा

मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिर हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र स्थळाचे नवनिर्माण अत्याधुनिक सुविधा आणि पारंपरिक वास्तुशैली जपत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

सध्या संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात असून, त्याला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदारांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

विश्वस्त मंडळासोबतही पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. दुर्घटनेच्या वेळी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आमदारांनी अग्निशमन विभागाचे विशेष कौतुक केले.

यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा संत प्रसाद महाराजांशी थेट संवाद; पुनर्बांधणीसाठी शासनाची ठाम भूमिका

दुर्घटनेमुळे श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना या घटनेमुळे दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधताना दिली.

भडगाव येथे आमदार अनिल पाटील हे महाराजांच्या भेटीस गेले असताना त्यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराजांशी थेट संवाद साधत शासनाची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्र्यांकडे ₹१५ कोटींच्या विशेष निधीची मागणी

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून ₹१५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विधिमंडळातही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आपत्कालीन निधीची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य शासन या विषयावर सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर परमपूज्य संत प्रसाद महाराज म्हणाले, “साक्षात विठ्ठल माऊली आणि लाखो वारकरी भक्तांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नाही. मंदिराचे वैभव पूर्ववत उभे राहील, असा पूर्ण विश्वास आहे.”

महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आमदार अनिल पाटील दिंडीकडे मार्गस्थ झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *