ब्रेकिंग
अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून रु. ७५ लाख १८ हजारांचे (५० टक्के) अनुदान उपलब्ध होणार असून, उर्वरित निधी बाजार समितीकडून उभारला जाणार आहे.

राज्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार मंजूर झालेल्या एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदानाची रक्कम दोन समान हप्त्यांत वितरित करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्या मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जातील. बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच शेतकरी भवनाचा देखभाल-दुरुस्ती खर्च, वीज, पाणी, मनुष्यबळ व इतर सर्व खर्च संबंधित बाजार समितीनेच उचलायचा असून, त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी मिळणार नाही.

या शेतकरी भवनासोबत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना’ देखील राबविण्यात येणार आहे. शासनाकडून प्रति भोजन ४० रुपयांचे अनुदान मिळणार असून, बाजार समितीच्या सहभागातून शेतकऱ्यांना केवळ नाममात्र ५ रुपयांत भोजन उपलब्ध होणार आहे. याशिवाय शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी पुरुष, महिला तसेच हमाल-मापाडी यांच्यासाठी मुक्काम, विश्रांती आणि आवश्यक मूलभूत सुविधांचीही व्यवस्था या भवनात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये अमळनेरचा समावेश झाला आहे. पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या विशेष सहकार्यामुळे तसेच खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

याबाबत समाधान व्यक्त करताना अशोक आधार पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांनी सांगितले की, *”सातत्यपूर्ण तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या दीड कोटींच्या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुक्काम, विश्रांती, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. या कामासाठी पणन मंत्री ना. जयकुमार रावल, खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”

या प्रकल्पाबद्दल सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील तसेच संचालक मंडळाने महाराष्ट्र शासनाचे आभार मानले असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी शेतकरी भवनाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *