ब्रेकिंग
कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होणार का? दोन वर्षांपासून रखडलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार तातडीने वितरित करण्याची मागणी

 

 

प्रतिनिधी | अमळनेर 

ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासाठी सुरू करण्यात आलेला *“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”* गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यावर्षी तरी रखडलेले सर्व पुरस्कार थाटामाटात वितरित करून ग्रामीण महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 9 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गटपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा *31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त* सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

या पुरस्कारांतर्गत महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रति महिला 500 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येत होते. 31 मे 2023 रोजी राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढील दोन वर्षांचे पुरस्कार रखडले.

विशेष म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरही शासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने हजारो ग्रामीण महिलांवर अन्याय झाला असून शासन निर्णयाचाही अनादर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डी. ए. धनगर यांनी म्हटले आहे की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणेही तितकेच आवश्यक आहे.

यावर्षी तरी 2024, 2025 आणि 2026 या तीन वर्षांचे मिळून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींसाठी हा महत्त्वाचा प्रश्न बनला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार

 

अमळनेर : “आज उना आखजिना सन… त्याले दीना आम्ही आहेरना मान!” या पारंपरिक ओळींना साजेसा सामाजिक उपक्रम अमळनेर शहरात पाहायला मिळाला. आखाजीच्या पावन निमित्ताने अमळनेर नगरीचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम यांच्या पुढाकारातून होतकरू विद्यार्थ्यांचा घरगुती सत्कार करून एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील पैलाड येथील उदय अरुण सोनार या गुणवंत विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयात नियुक्ती मिळवली असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. याचबरोबर ते यूपीएससी परीक्षेची तयारीही करत आहेत. त्यांच्या या यशाचा गौरव करत आखाजीच्या पारंपरिक ‘आहेर’ पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्री. प्रशांत निकम, नगरसेवक श्री. पंकज भोई तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उदय सोनार यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, उदय यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या मातोश्रींचाही समाजसेवक श्री. मनोहर निकम यांच्या हस्ते सन्मान करून ‘मातेचा गौरव’ ही सुंदर परंपरा जपण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. मनोहर निकम यांनी केली. त्यानंतर श्री. प्रशांत निकम, श्री. कैलास भोई, वानखेडे सर आणि लांडगे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. सत्कारमूर्ती उदय सोनार यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले व आगामी यूपीएससी वाटचालीसाठी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

या उपक्रमाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर कौतुक व्यक्त करण्यात आले. होतकरू आणि गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला अमळनेर शहराचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम, श्री. पंकज भोई, समाजसेवक श्री. मनोहर निकम, श्री. हिरामण कणखरे, प्रा. श्री. गणेश पवार, भूषण भदाणे, महेश पाटील, चंदू वानखेडे, विजय वानखेडे, गौतम मोरे सर, जयवंतराव पाटील, नरसिंहराव वाघ, दशरथ लांडगे, कैलास भोई, बाळू बिराडे, विश्वासराव पाटील सर तसेच पतंजली महिला ग्रुपच्या सदस्यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, पारंपरिक आखाजी सणाला सामाजिक भानाची जोड देत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न

 

पातोंडा : जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे आयोजित करण्यात आलेले विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम आविष्कार घडवणाऱ्या या प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. यामध्ये सौ. प्रियंका शिंदे, सौ. वैशाली सोनवणे, श्रीमती सुषमा तायडे, सौ. छाया इसे तसेच श्री. स्वप्नील शिंदे व सागर भोई यांचा समावेश होता. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक कलाकृती, हस्तकला साहित्य, तसेच कार्यानुभवावर आधारित प्रकल्प सादर केले. रंग, कल्पकता आणि कौशल्य यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळालेल्या या व्यासपीठाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुनीता लोहारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सुषमा तायडे व सौ. छाया इसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळाले आहे.

एकूणच, या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार

 

 जळगाव : मावळते मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप देण्यात आला असून, त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. तसेच, नवनियुक्त मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अमळनेरात सराफ बाजारातील घराला लागली आग 

 अमळनेर :- येथील सराफ बाजार येथे दिनांक 20 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संजय मंगलचंद कोठारी यांच्या कापड दुकानावरील घराला अचानक आग लागली असता नागरिकांनी अग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली आणि पुढील अनर्थ टळला. ही आग तिसऱ्या मजल्या वरील घराला लागल्यामुळे तसेच खाली कापड दुकान असल्यामुळे मोठा अनर्थ झाला असता मात्र नगरसेवक गोपी कासार, सुरज परदेशी यांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क केला.

                    आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आकाश संधनशिव, लखन कंखरे, भिका संदनशिव, तसेच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

                   आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमळनेर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचा सेवा सप्ताह साजरा 

 

अमळनेर :- येथील नगरपरिषदेच्या ‘ अग्निशमन विभागातर्फे ‘ दिनांक 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अमळनेर साजरा झालेल्या आखाजी महोत्सवात ‘ अग्निशमन सप्ताह अंतर्गत ‘ जनजागृती पर स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलमध्ये अग्निशमन विभागाचे विविध प्रकारचे बचावासाठी लागणाऱ्या साहित्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तेथे ठेवण्यात आलेल्या विविध उपकरणांची माहिती नागरिकांना करून देण्यात येत होती.

              नागरिकांना अग्निशमन विभाग काय आहे हे कसे कार्य करते, सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. नागरिकांनी प्रत्यक्ष साहित्य पाहून अग्निशमन विभाग आपल्या सेवेसाठी किती तत्पर आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या सर्व उपकरणांची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी, कर्मचारी दिनेश बिराडे, जाफर पठाण, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदनशिव यांनी करून दिली.

                  अग्निशमन विभागाच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश

 

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीच्या मासिक जनजागर सोहळ्याची अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या अभियानाचा शुभारंभ वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, दि. 19 मार्च 2026 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. महिनाभर चाललेल्या या जनजागर उपक्रमाची सांगता समारंभपूर्वक पार पडली.

सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण सौ. राजश्री पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील, कृषी विभागाचे अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचे एकत्रीकरण करून करण्यात आली. या मातीपासून मंडल तयार करून मंत्रोच्चाराच्या माध्यमातून भूमी शुद्धीकरण व अभिमंत्रण विधी पार पडला. गणपती पूजन, संकल्प आणि विधिवत पूजा करून भूमी अभिमंत्रित करण्यात आली.

यानंतर ही अभिमंत्रित माती पाकिटांमध्ये भरून उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी देण्यात आली. यावेळी शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी माती संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच हा संदेश गावागावांत पोहोचवून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल पाटील व पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.या अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची जागतिक झेप — स्थानिक अनुभवांना मिळाले ग्लोबल व्यासपीठ

अमळनेरच्या मातीतून उठलेला आवाज आता थेट जागतिक व्यासपीठावर घुमला आहे—आणि त्यामागे आहे एक तरुण, संवेदनशील आणि जिद्दी चेहरा: शंतनू वाघमारे

अमळनेर : छोट्या शहरातील वास्तव, सामान्य माणसांच्या अडचणी आणि हवामान बदलाचा थेट परिणाम—हे सगळं आता केवळ स्थानिक चर्चेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांनी हा आवाज थेट ग्लोबल सिटिझन असेंब्ली (GCA)पर्यंत पोहोचवून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यान पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात जगभरातील नागरिक हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेवर विचारमंथन करतात. या प्रतिष्ठित मंचावर शंतनू यांनी अमळनेर आणि आसपासच्या भागातील वास्तव मांडत स्थानिक समस्यांना जागतिक परिप्रेक्ष्यात स्थान मिळवून दिले.

स्थानिक ते जागतिक — आधार संस्थेची साथ

या प्रवासात *आधार संस्था* यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. आवश्यक कागदपत्रे, समन्वय, आणि स्थानिक माहिती उपलब्ध करून देत संस्थेने शंतनूंना भक्कम पाठबळ दिले. ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये हवामान बदलाचे भासणारे परिणाम—जसे वाढती उष्णता, अनियमित ऋतू, आणि त्याचा शेती व रोजंदारीवर होणारा परिणाम—हे सर्व मुद्दे प्रभावीपणे मांडले गेले.

भाषांतरापलीकडे जाऊन आवाजाला दिली ताकद

शंतनू यांचे योगदान केवळ भाषांतरापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्थानिक लोकांच्या भावना, अनुभव आणि संघर्ष जागतिक पातळीवर स्पष्ट आणि प्रभावीपणे पोहोचवले. त्यामुळे चर्चेत केवळ तांत्रिक किंवा धोरणात्मक मुद्दे नव्हते, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्याचा वास्तव देखील समोर आले.

रिक्षाचालक किशोर पाटील यांचा आवाजही पोहोचला जगभर

या सत्रांमध्ये अमळनेरचे रिक्षाचालक किशोर पाटील यांनी स्वतःचे अनुभव मांडले. त्यांच्या साध्या पण वास्तववादी शब्दांतून हवामान बदलाचे दैनंदिन आयुष्यावर होणारे परिणाम स्पष्ट झाले.

 “आम्ही मोठ्या शब्दांत बोलत नाही, पण बदल दिसतोय… ऋतू बदलले आहेत, उष्णता वाढली आहे, आणि त्याचा आमच्या कामावर परिणाम होतो,” असे किशोर पाटील यांनी सांगितले.

शंतनूंनी त्यांच्या या भावना आणि अनुभवांना जागतिक मंचावर पोहोचवले—आणि त्यामुळे ‘सामान्य माणूस’ही या चर्चेचा केंद्रबिंदू बनला.

हवामान बदल आणि अन्न व्यवस्था — एक महत्त्वाची कडी

या चर्चांमध्ये हवामान बदल आणि अन्न व्यवस्थेतील संबंधावरही सखोल विचारमंथन झाले. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, अन्न उत्पादनातील अनिश्चितता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.

अमळनेरचा अभिमान — जागतिक स्तरावर ठसा

शंतनू वाघमारे यांचा हा सहभाग केवळ वैयक्तिक यश नाही, तर अमळनेरसारख्या छोट्या शहरासाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांनी दाखवून दिले की, स्थानिक स्तरावरचे प्रश्न आणि अनुभव योग्य व्यासपीठ मिळाल्यास जागतिक चर्चेतही प्रभाव निर्माण करू शकतात.

 “किशोरसारख्या लोकांचे आवाज जगापर्यंत पोहोचले पाहिजेत. हवामान बदलाचा खरा परिणाम आकड्यांमध्ये नाही, तर लोकांच्या आयुष्यात दिसतो,” असे शंतनू वाघमारे यांनी ठामपणे सांगितले.

निष्कर्ष : अमळनेरच्या मातीतील वास्तव आता जागतिक चर्चेचा भाग बनले आहे. शंतनू वाघमारे यांची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे—कारण बदलाची सुरुवात नेहमी आपल्या आसपासच्या जगातूनच होते.

 

अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी व्यापक सतर्कता अभियान

 

अमळनेर (जि. जळगाव) – अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी अमळनेर येथे महत्त्वपूर्ण सतर्कता अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन, आधार बहुउद्देशीय संस्था आणि पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या साने गुरुजी सभागृहात बैठक पार पडली.

या बैठकीत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहांमध्ये मुला-मुलींचे वय काटेकोरपणे पडताळण्याचे आवाहन करण्यात आले. विवाहापूर्वी आधार कार्ड, शाळेचा दाखला व जन्मदाखला तपासूनच मुहूर्त देण्याची जबाबदारी धर्मगुरू व पुरोहितांनी पार पाडावी, असे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनच्या पीएसआय कविता ठाणगे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. बालविवाह घडवून आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलीस कॉन्स्टेबल शामल पारधी यांचीही उपस्थिती होती.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक रेणू प्रसाद यांनी बालविवाहासोबतच बाल तस्करी, लैंगिक शोषण आणि बालमजुरी यांसारख्या गंभीर समस्यांवर मार्गदर्शन केले. या अभियानाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे करण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, दीप्ती गायकवाड, अश्विनी भदाणे, भावना सूर्यवंशी आदींसह पुरोहित संघाचे निलेश जोशी, श्रीकांत पाठक, हरिश्चंद्र जोशी, प्रफुल जोशी, अरविंद नाईक, अक्षय नाईक, ज्ञानेश्वर भावे, प्रदीप कुमार जोशी, प्रशांत जोशी, महेश कुलकर्णी, नंदकुमार जहांगीदार, सुनील जोशी, सारंग गर्गे व मंगेश काळकर उपस्थित होते.

बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी प्रशासन, पोलीस, सामाजिक संस्था आणि धर्मगुरू यांनी एकत्रितपणे घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

 

अमळनेरात आखाजी महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद; अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी शासकीय पाठबळाची गरज – राजेश पांडे

 

अमळनेर : खान्देशाची ओळख असलेल्या आखाजी महोत्सवाने यंदा अमळनेरात अभूतपूर्व उत्साहात रंगत घेतली. अहिराणी संस्कृतीतील गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी अशा पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले. या महोत्सवाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा उपक्रम शासकीय स्तरावर आणि मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

खान्देश साहित्य संघाच्या वतीने अमळनेर येथील एलआयसी कॉलनीत आयोजित पहिल्या आखाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते.

राजेश पांडे पुढे म्हणाले, “अमळनेर सोडून ३८ वर्षे झाली असली तरी अहिराणी भाषेची गोडी अजूनही तितकीच आहे. त्यामुळेच मी आज अहिराणीतून संवाद साधत आहे. आधुनिक युगातही महिलांनी या परंपरा जपल्या पाहिजेत, ही काळाची गरज आहे.”

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी परंपरा जतन केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अहिराणीतील फटकेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले, तर स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष तथा कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, खजिनदार प्राचार्या रत्नाताई पाटील, जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, दिनेश नाईक, एल.टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सभापती अशोक पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. व्ही.आर. पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. डिगंबर महाले, सचिन पाटील, अमेय मुंदडा, रिता बाविस्कर, राजू फपोरेकर, ज्ञानेश्वर धनगर, जयेशकुमार काटे आदींचे सहकार्य लाभले.

महोत्सवात पारंपरिक पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुरणपोळी स्पर्धेत प्रतिभा चौधरी प्रथम, नयना पाटील द्वितीय, तर मंगल सोनवणे तृतीय ठरल्या. झोक्यावरच्या गाण्यांमध्ये मेघना पवार व दीपिका पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उखाणे वेशभूषा स्पर्धेत विजयाताई पाटील प्रथम ठरल्या. आरास स्पर्धेत जिजाऊ ग्रुपने बाजी मारली.

घट्यावरच्या गाण्यात रंजना महाजन प्रथम, तर चित्रकला स्पर्धेत आशा दुसाने व लता दुसाने यांनी द्वितीय, श्यामल पाटील व कल्पना देवरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धांचे परीक्षक म्हणून वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, लीना पाटील, सुरेखा बाविस्कर, दर्शना पवार, बोरकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संजय पाटील व पूनम बेडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी केले.

अमळनेरात पहिल्यांदाच भरलेल्या या आखाजी महोत्सवाने अहिराणी संस्कृतीच्या जतनासाठी नवा आदर्श निर्माण केला असून, भविष्यात हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.