दुष्काळी परिस्थितीत घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा; सक्तीची वसुली थांबवा! ग्रामपंचायत प्रशासकांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमळनेर प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना ग्रामपंचायतींकडून घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने ग्रामीण भागात नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी आणि सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसून रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत घरपट्टी आणि पाणीपट्टीची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.
याशिवाय जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर नियुक्त प्रशासकांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासकांच्या उपस्थितीबाबत तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजाबाबत वस्तुस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या अशा : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींवरील प्रशासकांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी करावी, घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांची घरपट्टी-पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, यासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींना लेखी आदेश द्यावेत, तसेच संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आणि कर वसुलीचा अहवाल मागवावा.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना आर्थिक दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्याऐवजी शासनाने घरपट्टी व पाणीपट्टी माफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना ईश्वर उखा पाटील, शरद विनायक पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश बोरसे, ॲड. योगराज कोळी, दिलीप चौधरी, भूषण कोळी आदी उपस्थित होते.


