रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा! कीर्तीकुमार कोठारी यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड
अमळनेर प्रतिनिधी : रोटरी इंटरनॅशनल या जागतिक सेवाभावी संस्थेच्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अंतर्गत अमळनेर रोटरी क्लबचे सक्रिय सदस्य रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सन २०२७-२०२८ या रोटरी वर्षासाठी असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रोटे. कीर्तीकुमार कोठारी हे सध्या २०२६-२०२७ या रोटरी वर्षासाठी अमळनेर एन्क्लेव्हचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. रोटरी क्लब अमळनेरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सन २०२७-२०२८ साठी नियुक्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. किशोर राठी (नागपूर) यांनी ई-मेलद्वारे त्यांच्या निवडीची अधिकृत माहिती दिली.
रोटे. कीर्तीकुमार कोठारी हे अमळनेर येथील सुप्रसिद्ध कीर्ती कॉम्प्युटरचे संचालक असून अकाउंटिंग क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने व कुशलतेने पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील ज्येष्ठ पदाधिकारी, रोटरी परिवारातील सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कीर्तीकुमार कोठारी यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ही माहिती रोटे. मकसूद बोहरी यांनी दिली.


