पातोंडा-दहिवद शिवारात केबल चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी संतप्त सहा दिवसांत दोनदा चोरी; रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील पातोंडा व दहिवद परिसरातील शेतशिवारात विहिरी आणि बोअरवेलच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. केबल चोरीसोबतच गुरे चोरीचे प्रकारही वाढल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चोरटे शेतातील महागड्या केबल कापून नेत आहेत. केबलमधील तांबे काढण्यासाठी चोरटे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या पेटवून त्यात केबल वितळवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या सहा दिवसांत दोन वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. उधारीने नवीन केबल खरेदी करून बसवल्यानंतरही चोरट्यांनी पुन्हा त्याच केबल चोरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वारंवार तक्रारी करूनही चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याने संतप्त शेतकरी अमळनेर-चोपडा महामार्गावर रास्ता रोको करण्याच्या तयारीत होते. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. पोलिसांनी पंचनामा करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे तसेच रात्रीची गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना केबल व गुरे चोरीच्या घटनांचा अतिरिक्त फटका बसत आहे. त्यामुळे रात्रीची नियमित गस्त सुरू करावी, चोरट्यांना तातडीने पकडावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण न मिळाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


