श्री मंगळग्रह मंदिरात श्री विष्णू-लक्ष्मीचा प्रतिकात्मक विवाह सोहळा उत्साहात तुळशी विवाहानिमित्त १५ व्या वर्षीही परंपरेचे जतन; हजारो भाविकांची उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी : हिंदू संस्कृतीतील तुळशी विवाहाच्या परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मंगळवारी (दि. २४) भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे यंदा १५ वे वर्ष असून हजारो भाविकांनी उपस्थित राहून विवाह सोहळ्याची साक्ष घेतली.
दुपारी १२.१५ वाजता वैदिक मंत्रोच्चार व मंगलाष्टकांच्या गजरात विवाह विधी संपन्न झाला. यापूर्वी संबळ वाद्यांच्या साथीने भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेची मंगलरथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व प्रसाद भंडारी यांनी मुख्य पौरोहित्य केले. सकाळी महाआरतीनंतर दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या विवाह सोहळ्यात भगवान श्री विष्णूजींचे मामा म्हणून भटू प्रकाश शिंदे, तर श्री लक्ष्मी मातेचे मामा म्हणून सुनील माणिक बिऱ्हाडे यांनी विधी पार पाडले. विशेष म्हणजे कोणताही अनावश्यक खर्च अथवा भव्य सजावट न करता साध्या व पारंपरिक पद्धतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आशाताई महाले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.
हळद-मेंदी कार्यक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळशी विवाहाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २३) मंदिर परिसरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेच्या प्रतिकात्मक विवाहानिमित्त हळद-मेंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर माता-भगिनींनी नृत्य व फुगडीचा आनंद घेतला. असंख्य महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
साधेपणातून परंपरेचे जतन
विवाह सोहळ्यांमध्ये होणारी पैशांची उधळपट्टी टाळून विवाह विधी साधेपणाने व शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावेत, हा सामाजिक संदेश मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे या उपक्रमातून दिला जात आहे. पारंपरिक चालीरीती, रूढी व संस्कृतीचे जतन करत संस्थेने ही परंपरा गेल्या १५ वर्षांपासून सुरू ठेवली आहे.


