पातोंड्यात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच दुकाने फोडली रोकड, लॅपटॉप लंपास; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांच्या विलंबाने दुकानदारांमध्ये नाराजी
अमळनेर, प्रतिनिधी : तालुक्यातील पातोंडा आणि मठगव्हाण येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली. या चोरीच्या घटनांमध्ये दुकानदारांची रोकड आणि लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला. पातोंडा येथील मशिदीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन अज्ञात चोरटे मोटारसायकलवरून जाताना दिसून आले आहेत. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पातोंडा येथे काही दिवसांपूर्वी शेतातील केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी गावातील दुकानांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे मोटारसायकलवरून गावात दाखल झाले.
दत्त मंदिराजवळील भरत सोनार यांच्या ओम साई ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, दुकानातील सेंट्रल लॉक न तुटल्याने त्यांनी मस्जिदजवळील रमाकांत पाटील यांच्या श्री मेडिकलकडे मोर्चा वळवला. मेडिकलमधून दोन ते तीन दिवसांची गल्ल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला.
त्यानंतर ग्रामपंचायत शॉपिंगमधील चंदू सूर्यवंशी यांच्या लक्ष्मीसदा कृषी केंद्रातून पाच हजार रुपये चोरले. पुढे सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील मठगव्हाण फाट्यावरील नाना कोळी यांच्या हॉटेलमधून दोन हजार रुपये, तर समोरील जितू कोळी यांच्या कृषी केंद्रातून पाच हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, घटनास्थळी पोलिस दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहोचल्याने दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. सकाळी आठ वाजता घटनेची माहिती देऊनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी दुपारपर्यंत वेळ लागल्याने चोरीच्या घटनेचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याची भावना दुकानदारांनी व्यक्त केली.
संबंधित दुकानदारांनी अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पातोंडा गावात सार्वजनिक सीसीटीव्हींचा अभाव
पातोंडा हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून, परिसरातील अनेक गावांतील नागरिक बाजारासाठी येथे येत असतात. मात्र, गावात सार्वजनिक सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ग्रामपंचायत चौक, दत्त मंदिर, बसस्थानक, जुने पोलिस स्टेशन आणि मराठी शाळा परिसरात ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यास चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
