ब्रेकिंग
अमळनेर पोलीस ठाण्यात सदिच्छा भेटीदरम्यान अधिकाऱ्यांचा सत्कार

 

अमळनेर ( प्रतिनिधी) :  अमळनेर पोलीस ठाण्यात आढावा भेटीदरम्यान तत्कालीन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव मा. श्री. अशोक नखाते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्यासोबत विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली.

सदिच्छा भेटीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा सत्कार प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांचा सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विनायक कोते यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, होमगार्डचे अमळनेर तालुका समादेशक गोपाल वना पाटील, कंपनी नायक अरुण नेरकर, वरिष्ठ पलटण नायक रविंद्र ठाकूर तसेच जळगाव PTC येथील कैलास पाटील, कमलेश वानखेडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड विभागातील अधिकारी उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे पोलीस प्रशासन व होमगार्ड विभागातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भेटीचे स्वागत केले.

संविधानाची उद्देशिका म्हणजे संविधानाचा आत्मा -प्रा. डॉ. राहुल निकम 

 

 

अमळनेर  ( प्रतिनिधी) : भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे संविधानाचा आत्मा असून संपूर्ण संविधानाचा संपूर्ण सार त्या एक वाक्यीय उद्देशिकेत सामावलेला आहे. संविधानाचे संपूर्ण प्रतिबिंब संविधानाच्या उद्देशिकेत आपणास जाणवते त्यामुळे ते समजून घेणे आवश्यक असल्याचे असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम यांनी महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लासुर या ठिकाणी केले. माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख निर्माण होऊन संविधानिक मूल्यांचा परिचय व्हावा या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी त्यांनी उद्देशिकेतील सर्व शब्दांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. संविधान समजावून घेऊन त्यानुसार वागण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे मत त्यांनी नमूद केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक एस जी पाटील हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयातील तृतीय वर्ष स्नातकच्या विद्यार्थ्यांनी संविधान गीत सादर केले. एस जी पाटील यांनी संविधान निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवरांचे योगदान विद्यार्थ्यांसमोरचा मांडले. पी डी शिंदे यांनी संविधानामुळे मिळालेले हक्क आणि अधिकार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व थोडक्यात सांगितले.

       याप्रसंगी विचारमंचावर समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा.डॉ. उत्तम सोनकांबळे, पी डी शिंदे, एस एस माळी, पी ए माळी, वाय बी बोरसे, वंदना पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर एस पाटील आणि समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्राचार्य डॉ ईश्वर सौंदाणकर यांच्या मार्गदर्शनानुसार सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी शिंदे यांनी केले.

कळमसऱ्यात ‘राम-रहीम गणपती’चा अनोखा उपक्रम; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे घडविले आदर्श उदाहरण मुस्लिम बांधवांचा पुढाकार; गणपती स्थापनेपासून महाप्रसादापर्यंत उत्साहाने सहभाग

 

कळमसरे, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाने हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याची अनोखी परंपरा जपत एक आदर्श निर्माण केला आहे. गावातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत गणपतीची स्थापना केली असून, या गणपती मंडळाला ‘राम-रहीम गणपती’ असे नाव देण्यात आले आहे. गणपती स्थापनेपासून वर्गणी संकलन, आरती, धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाच्या आयोजनापर्यंत मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

कळमसरे हे विविध जाती-धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदणारे गाव आहे. येथील मुस्लिम समाज हिंदूंच्या विविध सण-उत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी होतो, तर मुस्लिम समाजाच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्येही हिंदू बांधव मोठ्या आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे गावात सामाजिक एकोपा आणि परस्पर बंधुभावाची भावना दृढ झाली आहे.

पाडळसरे फाट्यावर पठाण कुटुंबीयांचे गॅरेज असून मेहमूद खान, वसीम खान, सलीम खान आणि नईम खान या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत गणपतीची स्थापना केली आहे. त्यांच्या या उपक्रमातून धार्मिक सलोखा आणि ‘सर्व धर्मांचा सन्मान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.

पठाण कुटुंबीयांचे या परिसराशी जुने संबंध असून, त्यांच्या पूर्वजांपासून सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली जात असल्याचे सांगितले जाते. हिंदू समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये या कुटुंबाचा नेहमीच पुढाकार असतो. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्येही संपूर्ण गावातील हिंदू बांधव सहभागी होत असल्याने कळमसरे गावातील सामाजिक एकतेचे दर्शन घडते.

या कुटुंबातील नव्या पिढीनेही शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. कुटुंबातील मुले-मुली उच्च शिक्षण घेत असून, एका विद्यार्थिनीचे औरंगाबाद येथे वकिलीचे शिक्षण सुरू आहे. तर एका कुटुंबातील मुलगी विद्यापीठात एम.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. कुटुंबातील एक युवक विदेशात नोकरी करीत आहे.

धर्म, जात आणि पंथाच्या भिंती ओलांडून ‘माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीतून बळ देणाऱ्या पठाण कुटुंबाच्या या उपक्रमाचे अमळनेर तालुक्यात कौतुक होत आहे. ‘राम-रहीम गणपती’च्या माध्यमातून कळमसरे गावाने एकतेतून समाजाची शक्ती वाढते, असा सुंदर संदेश दिला आहे.

विषुवदिनानिमित्त पोस्टरमधून विद्यार्थ्यांनी मांडल्या ज्वलंत भौगोलिक समस्या सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन; २५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

भडगाव ( प्रतिनिधी) : येथील सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे विषुवदिनानिमित्त दि. २३ सप्टेंबर रोजी विविध भौगोलिक व पर्यावरणीय समस्यांवर आधारित पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून विविध गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पोस्टर्समधून हवामान बदल, ओझोन क्षय, पर्वत व जमीन खचणे, अतिवृष्टी, प्रदूषण, वाढती लोकसंख्या, रोगराई तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या यांसारख्या ज्वलंत विषयांचे प्रभावीपणे चित्रण करण्यात आले. पर्यावरणातील बदल, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि भविष्यातील आव्हाने यांची जाणीव करून देणारे हे पोस्टर विशेष आकर्षण ठरले.

स्पर्धेचे उद्घाटन धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील प्रा. डॉ. ईश्वरसिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ठाकूर यांनी, “भूगोल हा केवळ पृथ्वीच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करणारा विषय नसून त्यामध्ये विविध विज्ञान शाखांचा समन्वय आढळतो. निसर्ग हा सर्वश्रेष्ठ असून, अलीकडच्या काळात घडलेल्या विविध भौगोलिक घटनांमधून त्याची प्रचिती येते,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न पोस्टरच्या माध्यमातून मांडल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संजय भैसे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. देवेंद्र मस्की यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा. मोहनदास महाजन व प्रा. कु. उज्वला पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देतानाच पर्यावरण व भूगोलविषयक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.

खदाणीत पडलेल्या पिता-पुत्राची पालिका पथकाकडून सुखरूप सुटका… चोपडा रोडवरील घटनेत आरोग्य विभाग व अग्निशमन दलाची तत्परता; कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केले बचावकार्य…

 

 

प्रतिनिधि | अमळनेर : गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी चोपडा रोड येथील खदाणीजवळ गणपती विसर्जनासाठी आलेल्या अंदाजे १० ते ११ वर्षांच्या मुलासह त्याचे वडील खदाणीतील पाण्यात पडले. वडिलांचा पाय घसरल्याने त्यांच्या हाताला धरलेला मुलगाही पाण्यात ओढला गेला. घटना घडताच परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी नगरपरिषदेला त्याबाबतीत फोनवरून कळवले.

घटना लक्षात येताच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुकादम नितीन भावलाल बिऱ्हाडे, स्वप्नील विजय बिऱ्हाडे, गौतम सुरेश मोरे, समाधान वसंत केदार, आदर्श सुधाकर सोनवने, प्रवीण आनंदा बिऱ्हाडे, दिनेश अशोक संदानशिव, संदीप भिवसन गढरे, मुकेश अशोक संदानशिव व दीपक निळकंठ संदानशिव व सत्यम संदानशिव यांनी बचावकार्यात सहभाग घेतला. अग्निशमन दलाचे भिका संदानशिव, फारुक शेख व दिनेश बिऱ्हाडे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला हातभार लावला.

या बचावकार्यात प्रामुख्याने स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक साहेब व मुकादम गोल्डी बिऱ्हाडे यांनी दाखविलेल्या धाडसाचे व तत्परतेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकटात सापडलेल्या पिता-पुत्राच्या मदतीसाठी त्यांनी घेतलेली धाव आणि बजावलेली भूमिका याबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

पथकातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता, धाडस व समन्वयाने प्रयत्न करत पिता-पुत्राला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

या बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे व धाडसाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. संकटाच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पिता-पुत्राच्या मदतीसाठी धाव घेतल्याबद्दल नागरिकांनी नगरपालिका आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या पथकाचे अभिनंदन केले.

मंगरूळ येथे जायन्ट्स ग्रुपचा स्तुत्य उपक्रम १०५ विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी; विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप

 

अमळनेर : जायन्ट्स ग्रुपतर्फे सुरू असलेल्या जायन्ट्स सप्ताहानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असून, याच उपक्रमांतर्गत मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील तब्बल १०५ विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाची माहिती असलेली ओळखपत्रेही मोफत देण्यात आली.

जायन्ट्स ग्रुपतर्फे १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमळनेर तालुक्यात जायन्ट्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान वृक्षारोपण, पुस्तक वाटप, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी तसेच एआय तंत्रज्ञानावर प्रशिक्षण असे विविध उपक्रम मोफत राबविण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांमध्ये जनजागृती व सेवा देण्याचा प्रयत्न जायन्ट्स ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

मंगरूळ येथील विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी मधील १०५ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाची अचूक माहिती मिळावी आणि भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. रक्तगट तपासणीनंतर विद्यार्थ्यांना रक्तगट नमूद असलेली ओळखपत्रे मोफत देण्यात आली.

या उपक्रमासाठी जायन्ट्स चे अध्यक्ष डॉ महेश पाटील, उपाध्यक्ष ऍड राजेंद्र चौधरी, संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच जीवनश्री ब्लड बँकेचे संतोष वाघ, महेश पाटील, संजय मुंडके यांनी रक्तगट तपासणीसाठी विशेष सहकार्य केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, संजय पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, राहुल पाटील, प्रदीप पाटील, खुशाल पाटील यांच्यासह शिक्षक व संबंधित उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. जायन्ट्स सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक सेवा, आरोग्य जागृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविले जात असल्याने जायन्ट्स ग्रुपच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा दमदार रूट मार्च शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांचा संचलन; कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संदेश

 

अमळनेर, दि. २३ सप्टेंबर : गणेशोत्सव तसेच अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सज्जता दाखवून देण्यासाठी अमळनेर पोलिसांतर्फे बुधवारी शहरातील विविध संवेदनशील भागांत रूट मार्च काढण्यात आला.

बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत हा रूट मार्च पार पडला. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर विभाग श्री. विनायक कोते यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातील विविध भागांत संचलन केले.

रूट मार्चदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डी.पी., वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक तसेच गांधलीपुरा पोलीस चौकी या भागांत पोलिसांचे संचलन करण्यात आले.

गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात आली आहे. रूट मार्चच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

या रूट मार्चमध्ये ९ पोलीस अधिकारी, ९५ पोलीस अंमलदार, १ आर.सी.पी. पथक, १ स्ट्रायकिंग फोर्स आणि ११८ होमगार्ड अशा मोठ्या पोलीस फौजफाट्याने सहभाग घेतला.

गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी अमळनेर पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही उत्सव काळात प्रशासनास सहकार्य करून शांतता, सलोखा आणि सामाजिक सौहार्द कायम ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संविधानिक हक्कांसाठी उपवर्गीकरणाच्या विरोधातील जनआक्रोश महामोर्चा यशस्वी करा मुकुंद सपकाळे यांचे आवाहन; बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा

 

 

अमळनेर : अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण हे न्याय्य हक्कांच्या विरोधात असून, संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला उपवर्गीकरण विरोधी जनआक्रोश महामोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी केले.

महामोर्चाच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडत मोर्चाच्या व्यापक आयोजनाबाबत चर्चा केली. समाजाच्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीत प्रमोद इंगळे, सतिश गायकवाड, भारती रंधे, संध्या तायडे, प्रतिभा शिरसाठ, मनोहर लोखंडे, जगदीश सपकाळे, रतन जोहरे, राजेंद्र सोनवणे, युवराज नरवाडे, भीमराव अडकमोल यांनी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

तसेच भैय्या सपकाळे, नारायण सोनवणे, यशवंत घोडेस्वार, आनंदा तायडे, राजू सपकाळे, अरुण वाघ, नीलू इंगळे, अजय इंगळे, राजुभाऊ साळुंके, रोशन महाले, संजय सोनवणे, जयपाल धुरंधर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी आयोजित या जनआक्रोश महामोर्चात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण अभियानाचा दणदणीत शुभारंभ डीएल सोशल फाउंडेशनच्या ‘संगणक प्रशिक्षण अभियान–२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्या बॅचला सुरुवात

 

 

अमळनेर, दि. २१ सप्टेंबर २०२६ :

डिजिटल युगात ज्ञानासोबतच संगणक व तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः महिला व विद्यार्थ्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करून त्यांच्यासाठी शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधींची दारे खुली करण्याच्या उद्देशाने डीएल सोशल फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संगणक प्रशिक्षण अभियान–२०२६’ अंतर्गत पहिल्या बॅचचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

या प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ संस्थेच्या संचालक सौ. भावना समाधान मैराळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी महिला, संस्थेचे पदाधिकारी, सहकारी तसेच प्रशिक्षणाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

या अभियानाच्या पहिल्या बॅचमध्ये १० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, त्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान तसेच आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित विविध बाबींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये एमएस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, मराठी व इंग्रजी टायपिंग, इंटरनेट व ऑनलाइन सेवा, ई-मेल, डिजिटल व्यवहार तसेच सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.

डिजिटल कौशल्यातून स्वावलंबनाकडे वाटचाल

आजच्या स्पर्धात्मक युगात संगणकाचे ज्ञान हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित राहिलेले नसून रोजगार, व्यवसाय, ऑनलाइन सेवा आणि दैनंदिन व्यवहारांसाठी अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. विशेषतः महिलांनी डिजिटल कौशल्य आत्मसात केल्यास त्यांना घरबसल्या विविध कामांच्या तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेता येऊ शकतो. हीच गरज लक्षात घेऊन डीएल सोशल फाउंडेशनने महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे.

‘डिजिटल कौशल्याचा नियमित सराव करा’ – भावना समाधान मैराळे

यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेच्या संचालक सौ. भावना समाधान मैराळे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत संगणक प्रशिक्षणाचा नियमित सराव करण्याचे आवाहन केले. डिजिटल कौशल्याचा उपयोग केवळ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी न करता शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि स्वावलंबनासाठी प्रत्यक्ष जीवनात करण्याचे त्यांनी सांगितले.

“ज्ञान, कौशल्य आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला व विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवणे” हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

येथे होणार प्रशिक्षण

या मोफत संगणक प्रशिक्षण अभियानाचे आयोजन मा. गायत्री कॉम्प्युटर, मराठा मंगल कार्यालयाजवळ, अमळनेर येथे करण्यात आले आहे. महिला व विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील आवश्यक कौशल्ये मोफत उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे अमळनेर परिसरातील युवक-युवती व महिलांना निश्चितच नवे व्यासपीठ मिळणार आहे.

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा विद्यार्थ्यांना स्वाधार योजना व विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती

 

अमळनेर | पारोळा : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय जळगाव यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व शिष्यवृत्ती योजनांबाबत जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यशाळेदरम्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सविस्तर माहिती दिली. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांसाठी या योजनेअंतर्गत रुपये ३८,०००/- ते ६०,०००/- पर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती देण्यात आली.

यासोबतच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, विशेष शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपलब्ध असलेल्या इतर योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि योजनेचा उद्देश याबाबतही कार्यशाळेत विस्तृत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती नोडल ऑफिसर डॉ. ईश्वर पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती नोडल ऑफिसर प्रा. डॉ. संभाजी सावंत, तसेच श्री. पी. पी. पाटील, प्रा. आर. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक न्याय विभाग जळगाव यांच्या वतीने पारोळा तालुका समन्वयक श्री आक्रम मुजावर, अमळनेर तालुका समन्वयक श्री नितीन भोई आणि एरंडोल तालुका समन्वयक श्री शांताराम हटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्वाधार योजना, विशेष शिष्यवृत्ती योजना तसेच विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अत्यंत सविस्तर व सोप्या पद्धतीने माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्न व शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिष्यवृत्ती वरिष्ठ विभागाचे कामकाज करणारे श्री प्रसाद पाटील यांनी केले. तर कनिष्ठ विभागाचे शिष्यवृत्ती कामकाज करणारे श्री गणेश खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री चंद्रकांत निकम व सुधाकर गजरे यांच्यासह सर्व शिक्षकेतर बंधू-भगिनींचे अनमोल सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची थेट आणि सविस्तर माहिती मिळाल्याने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरली.