ब्रेकिंग
डिजिटल सुरक्षेसाठी NCC कॅडेट्सचा पुढाकार सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती; NCC कॅडेट्सचे ॲपद्वारे डिजिटल सुरक्षेकडे पाऊल

 

जळगाव : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर N.M. College, जळगाव येथे NCC कॅडेट्समध्ये डिजिटल सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात Cyber Warriors विद्या सोनवणे, साक्षी तानाजी पाटील, राहुल चोपडे आणि जय ठाकूर यांनी उपस्थित NCC कॅडेट्सना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकींची सविस्तर माहिती देत, अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय समजावून सांगितले.

सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या फेक कॉल, बनावट मेसेज, OTP फ्रॉड, फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक, बनावट वेबसाइट, फेक ॲप तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक याबाबत कॅडेट्सना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती आणि त्यापासून सावध राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती देण्यात आली.

डिजिटल व्यवहार करताना केवळ अधिकृत ॲप आणि वेबसाइटचा वापर करणे, आपले पासवर्ड सुरक्षित ठेवणे, OTP किंवा गोपनीय माहिती कोणालाही न देणे तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, यावर विशेष भर देण्यात आला. सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहार करताना सजगता व जबाबदारीने वागणे हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान Quick Heal Foundation Anti Fraud App ची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. सायबर फसवणुकीपासून अधिक प्रभावीपणे सावध राहण्यासाठी या ॲपचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी उपस्थित NCC कॅडेट्सकडून ॲपचे activation करण्यात आले.

या उपक्रमासाठी Field Work Volunteer भारती पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाला डॉ. आर. बी. आमले यांचे मार्गदर्शन लाभले.

डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम NCC कॅडेट्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरला. ‘सावधानता हीच सायबर सुरक्षेची गुरुकिल्ली’ या भावनेतून कॅडेट्सनी डिजिटल सुरक्षेचा संदेश आत्मसात करीत समाजातही सायबर जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प केला.

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींची टेबल टेनिसमध्ये दैदिप्यमान कामगिरी जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड

 

अमळनेर : अनुभूती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने ऐतिहासिक व नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. या शानदार विजयासह संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक नामांकित व प्रतिष्ठित शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या, कस पणाला लावणाऱ्या आणि प्रत्येक सामन्यात उत्कंठा वाढविणाऱ्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली. पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

स्पर्धेतील तीन ते चार पात्रता फेरीचे सामने यशस्वीपणे पार करीत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने नामांकित शाळांच्या संघांना पराभूत केले. उपांत्यपूर्व सामन्यात रुस्तम इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करीत संघाने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामन्यात अनुभूती स्कूलच्या संघावर मात करीत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे सुवर्णमय विजेतेपद आपल्या नावावर केले.

या ऐतिहासिक विजयामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अथक मेहनत, जिद्द, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या दैदिप्यमान कामगिरीत अक्षरा जे. पाटील, विनिता डी. कोळी, हर्षिता जे. वाधवानी, हिताक्षी ए. पाटील आणि ग्रंथी के. पटेल या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या स्पृहणीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा, महेश माळी आणि विनायक सूर्यवंशी यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंगलबाई पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी विद्यार्थिनींचे शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी, अश्विन चौधरी तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी मिळविलेले हे जिल्हास्तरीय विजेतेपद त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेची साक्ष देणारे असून, आता विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी संपूर्ण शाळा परिवाराच्या शुभेच्छा या खेळाडूंना लाभत आहेत.

अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य

 

अमळनेर : मेरा युवा भारत, जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ निमित्त अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवासी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. पथनाट्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचरा कचरापेटीत टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच रेल्वे स्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ रेल्वे स्थानक – स्वच्छ अमळनेर’ या घोषणेतून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. पथनाट्यास प्रवासी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांचे मार्गदर्शन लाभले व अमळनेर रेल्वे स्थानकाचे वाणिज्य निरीक्षक रवि पांडे व स्थानक व्यवस्थापक अनिल बी. शिंदे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. अनिता खेडकर व प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या आयोजनात मेरा युवा भारत, अमळनेरचे तालुका समन्वयक सागर कोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पथनाट्यात तेजस्विनी, कीर्ती, रत्ना, जान्हवी, भावना, जान्हवी, अनुजा, मयुरी व क्रिस केदार यांनी सहभाग घेतला.

महिला विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन’; इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जनजागृती उपक्रम

 

जळगाव | प्रतिनिधी

डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगाव येथे महिलांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.

 

उपक्रमादरम्यान स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी महिला विद्यार्थिनींशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.

 

ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत महिला विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.

 

यावेळी विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. महिला विद्यार्थिनींना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

 

उपक्रमाच्या शेवटी महिला विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. त्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे उपक्रम प्रभावी ठरला. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सरांचे मार्गदर्शन लाभले.

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर पारोळा नगर परिषदेत आढावा बैठक उपाध्यक्ष मा. मुकेशजी सारवान यांच्या उपस्थितीत कामगारांच्या अडी-अडचणींवर सकारात्मक चर्चा; निवेदनांवर योग्य निर्णय घेण्याचे आदेश

 

 

पारोळा : पारोळा नगर परिषद, पारोळा येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच त्यांच्या विविध अडी-अडचणींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. मुकेशजी सारवान साहेब – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोग, मुंबई तसेच त्यांचे विशेष कार्य अधिकारी मा. राजेश सोनवणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवा विषयक प्रश्न तसेच कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडी-अडचणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला.

 

यावेळी भारतीय सफाई कामगार संघटना, जळगाव यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस – संतोष संदानशिव यांच्यासह दिपक संदानशिव, राजेश कल्याणी, जगदीश संदानशिव, सुनिल गढरे, मिलींद संदानशिव, करण चव्हाण व इतर संघटना पदाधिकारी यांनी विविध मागण्यांसंदर्भात निवेदने सादर केली.

 

सदर निवेदनांमधील मागण्यांवर मा. आयोग साहेबांच्या आदेशान्वये कामगारांच्या हिताचा विचार करून योग्य ते निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

सफाई कामगारांच्या समस्या व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

NSUI तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 

अमळनेर : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. याच उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI), जळगाव जिल्हा यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

 

यावेळी डी. ए. धनगर, भैय्यासाहेब मगर, पुष्पा भोजू पाटील, अनिता सौंदाणे, समाधान देविदास निकम आणि जावेद अख्तर शेख हबीब या कर्तृत्ववान शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (पूर्व) धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थी शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 

कार्यक्रमात रज्जाक शेख आणि संदीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे नसून, भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे समाजाचे शिल्पकार आहेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ पाटील यांनी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या कार्याचा तसेच NSUIच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम व संघटनात्मक कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.

 

कार्यक्रमास धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, पी. एस. बागुल, सत्तार तेली, प्रताप पाटील, गजेंद्र साळुंखे, एस. डी. देशमुख, उमेश संदानशिव, रोहिदास कपडे, रोहिदास दाजी, ताराचंद सूर्यवंशी, नरेश चव्हाण, भगवान संदानशिव, अजय भिल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि समाजनिर्मितीच्या कार्याचा सन्मान आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व उपस्थितांचे NSUIच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांची जबाबदारी; संघटन विस्तारासाठी सक्रिय कार्य करण्याचे आवाहन

 

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने राज्य संघटक श्री. किशोर रायसाकडा व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश विसपुते यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.

 

प्रा. डॉ. गाढे यांनी खान्देश विभागात पत्रकारिता क्षेत्रासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संघटनात्मक वाढीसाठी व विस्तारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

 

संघटनेची ध्येयधोरणे, उद्दिष्टे व नियमावलीचे पालन करून उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे वाढविणे, पत्रकार बांधवांना संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करणे तसेच संघटनेचा विस्तार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

प्रा. डॉ. विजय गाढे यांच्या अनुभवाचा, कार्यक्षमतेचा आणि संघटन कौशल्याचा संघटनेच्या भविष्यातील वाटचालीस निश्चितच लाभ होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री. किशोर रायसाकडा यांनी व्यक्त केला आहे.

 

यावेळी राज्य समन्वयक संजय जी. भोकर, राज्य अध्यक्ष नितेश सोमाणी, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोठे आणि राज्य संघटक किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

 

प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

 

जळगाव | प्रतिनिधी

डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले.

 

सत्रादरम्यान स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीची माहिती दिली. ओटीपीद्वारे फसवणूक, क्यूआर कोडद्वारे फसवणूक, एआय व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या फसवणुकीच्या पद्धती प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आल्या.

 

ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मजबूत पासवर्ड आणि 2FA वापरण्याचे महत्त्वही सांगण्यात आले.

 

यावेळी क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या अॅपच्या वापराबाबत आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

 

सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सत्र प्रभावी ठरले. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

काँग्रेस पक्षाची विचारसरणीच देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते : अविनाश उमरकर अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे एकदिवसीय शिबिर उत्साहात संपन्न; संघटन बळकटीकरणाचा निर्धार

अमळनेर : जातीयवाद, धर्मांधता, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांमुळे देशासमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करणारी काँग्रेसची संघटनात्मक ताकदच देशाला योग्य दिशेने नेऊ शकते, असे प्रतिपादन राजीव गांधी पंचायत राज प्रदेश अध्यक्ष श्री. अविनाश उमरकर यांनी केले.

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमळनेर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने प्रा. अशोक पवार यांच्या स्टडी रूममध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिशा संधान शिव, बापूराव ठाकरे, डी. ए. पाटील आणि संजय पाटील यांनी महात्मा फुले यांच्या विचारांना साजेसे गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. अविनाश उमरकर यांनी देशातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. महात्मा गांधी, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत लोकशाही, सामाजिक समता आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक बँकेचे माजी अधिकारी व शेतकरी नेते श्री. प्रशांत गावंडे होते. शिबिराचे प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री. बन्सीलाल भागवत यांनी केले.

यावेळी जिल्हा वक्ता सेल अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी शिबिरार्थींना संबोधित करताना काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे आणि विविध लोककल्याणकारी भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी काँग्रेस सेवा दलाची भूमिका, कार्यपद्धती आणि संघटनात्मक कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली.

दुपारच्या सत्रात सर्व शिबिरार्थींनी घरून आणलेले डबे एकत्र करून सहभोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी आणि एकजुटीचे वातावरण निर्माण झाले.

अध्यक्षीय भाषणात श्री. प्रशांत गावंडे यांनी काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात केलेला संघर्ष तसेच स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासात दिलेले योगदान जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. तसेच सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने जाब विचारत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रा. अशोक पवार यांनी ‘संघटन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अमळनेर तालुक्यातील १०० गावांमध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरात भिकाजी पाटील, मनोज पाटील, मनोहर सूर्यवंशी, कन्हैयाला कापडे, गजेंद्र साळुंखे, मोतीलाल जाधव, रोहिदास कापडे, पार्थराज पाटील, कल्पना महिरे, मगन पाटील, सुधाकर भैसे, प्रकाश सोनवणे, शालिग्राम पाटील, रामकृष्ण पाटील, विकास पाटील, महेश पाटील, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, राकेश पवार, सदाशिव पवार, कौस्तुभ पाटील, भगवान संधान शिव, अमित पवार, खंडेराव न्हावी, बापूराव पाटील, गोविंदा पाटील यांच्यासह जवळपास ५० शिबिरार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस सेवा दलाच्या संघटनात्मक विस्तारासह अमळनेर तालुक्यात गावागावांत कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्याचा निर्धार करण्यात आला.

अमळनेरात बिबट्याचा तरुणावर झडप; आरोळ्यांमुळे थोडक्यात बचाव! बोरी नदीकाठच्या साने नगर परिसरातील घटना; वनविभागाकडून दोन पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याची तयारी

 

 

अमळनेर : शहरातील साने नगर परिसरातील बोरी नदीकाठच्या झुडपांमध्ये बसलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याने अचानक झडप घातल्यानंतर तरुणाने प्रसंगावधान राखत जोरजोरात आरोळ्या मारल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. त्यामुळे तरुणाचा थोडक्यात बचाव झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बोरी नदीकाठच्या परिसरात एक तरुण झुडपांमध्ये बसला असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याची चाहूल लागताच तरुणाने आरडाओरड केल्याने परिसरात खळबळ उडाली. त्याच्या आरोळ्यांमुळे बिबट्या तेथून निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला.

 

घटनेची माहिती मिळताच वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक योगेश पाटील आणि वनरक्षक मनीषा मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्यासह नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली.

 

दरम्यान, बिबट्याचा वावर लक्षात घेता वनविभागाने परिसरात दोन पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरे लावण्याची तयारी सुरू केली आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

बोरी नदीकाठच्या झुडपी भागात बिबट्याचा वावर आढळल्याने साने नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठ, झुडपे तसेच परिसरातील नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.