गोवंश कत्तलीच्या संतापानंतर अमळनेरचा अधिकृत कत्तलखाना अखेर सील! ५७० किलो मांस आढळल्याने शहरात खळबळ; हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात्मक इशाऱ्याची पालिका प्रशासनाकडून दखल
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील अधिकृत कत्तलखान्यात गोवंश कत्तलीच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या तीव्र संतापाची अखेर दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने कत्तलखाना सील करण्याची कारवाई केली आहे. सुमारे ५७० किलो मांस आढळून आल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे हिंदू संघटना, गोरक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर नागरिकांच्या भावनांचा आदर करत लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी कत्तलखाना सील करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कत्तलखान्यात गोवंश कत्तल होत असल्याच्या आरोपांनंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच गोरक्षकांच्या प्रतिनिधींनी शिष्टमंडळासह नगरपरिषद प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कत्तलखाना तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी संघटनांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटमही दिला होता. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी कत्तलखाना सील करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश दिले. आरोग्य विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात कत्तलखाना सील करण्याची कारवाई पूर्ण केली.
या कारवाईत आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, संतोष जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, मयूर पाटील, नम्रता जरे, योगेश पवार, अनंत संधान, शिव रिजवान शेख, सलीम परम चव्हाण आदींचा सहभाग होता.
संघटनांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची निर्णायक भूमिका
कत्तलखान्यातील कथित गोवंश कत्तलीचा मुद्दा शहरात चर्चेचा विषय बनला होता. सुमारे ५७० किलो मांस आढळल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी उपस्थित केलेल्या मागण्यांनंतर नगरपरिषद प्रशासनाने अखेर प्रत्यक्ष कारवाई केल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. आता कत्तलखाना सील केल्यानंतर पुढील काळात अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


