पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी दाखवली कौशल्याची चुणूक; तीन दिवस रंगला क्रीडा महोत्सव
अमळनेर प्रतिनिधी : पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित तीन दिवसीय हिवाळी वार्षिक क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण, आनंदमय आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाला. विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात सांघिक भावना, शिस्त, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक महेश माळी आणि पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांच्या हस्ते माता सरस्वती व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन, माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये विविध मैदानी व सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, डॉजबॉल, कबड्डी, क्रिकेट, स्लो सायकलिंग, बुक बॅलन्सिंग, गोळाफेक आदी स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडाक्षमता, चपळता आणि कौशल्याचे दर्शन घडविले.
या स्पर्धेत ग्रीन हाऊस, येलो हाऊस, रेड हाऊस आणि ब्लू हाऊस अशा चार हाऊसच्या संघांनी सहभाग घेतला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. विजयासाठी प्रयत्न करतानाच एकमेकांना प्रोत्साहन देण्याची आणि खिलाडूवृत्ती जपण्याची भावना विद्यार्थ्यांनी दाखवून दिली.
स्पर्धांचे नियोजन, मार्गदर्शन, संयोजन तसेच पंच व रेफरी म्हणून क्रीडा शिक्षक महेश माळी, विनायक सूर्यवंशी, रोहन मुंदडा आणि प्रशांत वंजारी यांनी जबाबदारी पार पाडली.
या क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे चेअरमन संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, निलेश चौधरी, अशोक महाजन, लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, अभ्यासाबरोबरच खेळातून शारीरिक सुदृढता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. अशा सकारात्मक वातावरणात वार्षिक क्रीडा स्पर्धेची सांगता झाली.


