दिव्यांगांचे मासिक मानधन ६ हजार रुपये करा; प्रहार अपंग क्रांती संघटनेची आमदार अनिल पाटील यांच्याकडे मागणी! दिव्यांगांच्या १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर; आगामी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची विनंती.
अमळनेर : महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना मिळणारे मासिक मानधन सध्याच्या २ हजार ५०० रुपयांवरून वाढवून किमान ६ हजार रुपये करण्यात यावे, यासह दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि रोजगाराच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आमदार अनिलदादा पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले.
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना वाढत्या महागाईच्या काळात मिळणारे मासिक मानधन अत्यंत अपुरे ठरत आहे. अन्नधान्य, औषधोपचार, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागविताना दिव्यांग बांधवांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शारीरिक मर्यादा आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधींमुळे अनेकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेने निवेदनातून एकूण १२ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांचे मासिक मानधन ६ हजार रुपये करणे व महागाईनुसार दरवर्षी त्यात वाढ करणे, शासकीय योजनांमधील जाचक अटी शिथिल करणे, बेरोजगार दिव्यांग युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, राखीव पदे तातडीने भरणे, स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच घरकुल योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, लॅपटॉप व उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत द्यावी, शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार व औषधोपचार उपलब्ध करावेत, कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल आणि श्रवणयंत्र मोफत द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर व्हावा, एसटी व रेल्वे प्रवास सवलतींचा लाभ सुलभतेने मिळावा, दिव्यांग महिलांसाठी विशेष योजना राबवाव्यात, तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, यावरही संघटनेने भर दिला आहे.
दिव्यांगांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अंत्योदय अन्नधान्य योजनेचा लाभ पात्र दिव्यांगांना प्राधान्याने द्यावा, तसेच जिल्हा व तालुकास्तरावर नियमित आढावा बैठका घेऊन दिव्यांग संघटनांना शासकीय समित्यांमध्ये प्रतिनिधित्व द्यावे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आमदार अनिलदादा पाटील यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात दिव्यांग बांधवांचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, मासिक मानधन ६ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती संघटनेने केली आहे.
‘दिव्यांगांना दया नको, हक्क हवा, आश्वासन नको, प्रत्यक्ष न्याय हवा!’ या घोषणेद्वारे दिव्यांग बांधवांच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काचा आवाज संघटनेने बुलंद केला.
यावेळी करीम बागवान, फारुक शेख, बिरजू पेपरसी, नूरखान, अमोल मराठे, कलीम शेख, मंजू ताई, आबा दशमुख, सविता ताई, सलमा बागवान आदी उपस्थित होते.


