ब्रेकिंग
सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचा अवमान; अमळनेरात काँग्रेस आक्रमक संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

अमळनेर प्रतिनिधी : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

 

आंदोलनापूर्वी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शांताराम पाटील, सुलोचना वाघ, मनोज पाटील, भागवत गुरुजी आणि ॲड. रज्जाक शेख यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान करणाऱ्या कृतीचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

 

सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकाची पाने तसेच संबंधित पोस्टर्स फाडून संजय निरुपम यांनी सोनिया गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली असल्याने या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

 

अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या कृतीचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. “सोनिया गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही” आणि “संजय निरुपम यांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.

 

यावेळी महेश पाटील, गजेंद्र साळुंखे, लोटन चौधरी, प्रताप पाटील, के. व्ही. पाटील, भिकाजी पाटील, अधिकार पाटील, रोहिदास कापडे, शिंदे, कन्हैयालाल कापडे, सुधाकर भैसे, दिलीप पाटील, प्रकाश सोनवणे, ताराचंद सूर्यवंशी, आर. जे. पाटील यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *