गोमातेच्या रक्षणासाठी २७ नोव्हेंबरला अमळनेरात जनआक्रोश आंदोलन; बेमुदत उपोषणाचा इशारा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाचा पुढाकार; तिरंगा चौक ते नगरपालिका मोर्चा
अमळनेर प्रतिनिधी : गोमातेचे रक्षण व सन्मान राखण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज, अमळनेर यांच्या वतीने शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी शहरात भव्य जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून, यावेळी बेमुदत आमरण उपोषणही सुरू करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या आंदोलनाला शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तिरंगा चौक येथून सुरुवात होणार असून, तेथून मोर्चा नगरपालिकेपर्यंत नेण्यात येणार आहे. गोमातेच्या रक्षणासाठी आणि कत्तलखान्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजातील नागरिक आणि गोभक्त सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गोमातेचे रक्षण व सन्मान हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


