ब्रेकिंग
दुष्काळग्रस्तांच्या घरपट्टी-पाणीपट्टी माफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक! वसुलीसाठी तगादा लावू नका; बीडीओंकडे निवेदनाद्वारे मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने तसेच रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी आणि ग्रामपंचायतींनी वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावू नये, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.

 

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

 

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्न नाही, शेतमजुरांना पुरेसा रोजगार मिळत नाही, तर सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत ग्रामपंचायतींकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी नोटिसा देणे, सक्तीची वसुली करणे अथवा नागरिकांवर मानसिक दबाव आणणे अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली.

 

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना आर्थिक दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा तातडीने निर्णय घ्यावा. तसेच याबाबत सर्व ग्रामपंचायतींना स्पष्ट निर्देश देऊन सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली.

 

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील, ईश्वर उखा पाटील, संदीप सैंदाने, हुमेश पाटील, अॅड. युवराज कोळी, जितेंद्र प्रभाकर काटे, भूषण कोळी, दिलीप पाटील, रविंद्र पाटील आणि राजिक मुजावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *