निम शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वासरावर हल्ला; तीन वर्षीय वासराचा मृत्यू वनविभागाचा प्राथमिक अंदाज; बिबट्या नसून ‘तळस’ प्राण्याचा हल्ला असल्याची माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निम शिवारात एका हिंस्त्र प्राण्याने तीन वर्षीय वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमळनेर येथील डॉ. संदीप जोशी यांच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या आवारात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. जोशी यांच्या मालकीचे निम शिवारात शेत असून, निम येथील शेतकरी सुदाम पाटील हे या ठिकाणी शेतीचे कामकाज पाहतात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना गोशाळेतील तीन वर्षीय वासरू मृतावस्थेत आढळून आले. हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अमळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
दरम्यान, वनपाल गुलाब पिंजारी यांनी घटनास्थळी आढळलेल्या प्राण्याच्या ठशांच्या आधारे वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. त्यामुळे परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चांना वनविभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, शेतकरी व नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात ये-जा करताना विशेष खबरदारी घ्यावी. तसेच परिसरात बिबट्या असल्याबाबत कोणत्याही अधिकृत पुष्टीशिवाय पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


