अमळनेरमध्ये २१ रोजी विकासकामांचे भूमिपूजन अन् शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार दोन्ही कार्यक्रम; राजकीय वर्तुळाचे लक्ष
अमळनेर (प्रतिनिधी) : शहराच्या विकासात भर घालणाऱ्या आठवडे बाजाराच्या ओट्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण असा दुहेरी कार्यक्रम शुक्रवार, दि. २१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता या दोन्ही कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे.
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि नगरसेवकांच्या प्रयत्नातून अमळनेर नगरपरिषद हद्दीतील फायनल प्लॉट क्रमांक १२३ येथे आठवडे बाजारासाठी ओट्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे शहरातील व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांना दिलासा मिळणार असून बाजारपेठेच्या व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे रोडवरील शिवांश बिझनेस हब येथे अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत आहे. या कार्यालयाचे लोकार्पणही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना उपनेत्या सरिता माळी (कोल्हे), शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक सभापती, गटनेते, नगरसेवक व मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथप्रमुख तसेच व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील आणि शहरप्रमुख विलास कंखरे यांनी केले आहे.


