ब्रेकिंग
डॉ. विवेक बोरसे यांचा स्टॅनफोर्डच्या ‘जगातील टॉप २% शास्त्रज्ञ’ यादीत सलग दुसऱ्या वर्षी समावेश ​विश्लेषणात्मक रसायनशास्त्र आणि वैद्यकीय तंत्रज्ञानातील संशोधनाचा जागतिक गौरव; IIT मुंबईचे माजी विद्यार्थी

 

​प्रतिनिधी / विशेष वृत्त

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रख्यात संशोधक डॉ. विवेक बोरसे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अमळनेरसह भारताचा गौरव वाढवला आहे. जगातील नामांकित स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर (Stanford University–Elsevier) यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात आलेल्या ‘जगातील अव्वल २% वैज्ञानिकांच्या’ (Top 2% Scientists) प्रतिष्ठित यादीत डॉ. बोरसे यांनी २०२५ आणि २०२६ या सलग दोन वर्षांसाठी आपले स्थान पटकावले आहे.

​विश्लेषणात्मक रसायनशास्त्र (Analytical Chemistry) या विषयातील त्यांच्या बहुमूल्य संशोधन कार्याची दखल घेत ही आंतरराष्ट्रीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या जागतिक यादीत त्यांची संस्थात्मक संलग्नता ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (NIPER), हैदराबाद अशी नोंदवण्यात आली आहे.

 

​IIT मुंबई ते वैद्यकीय उपकरण उद्योग असा व्यापक प्रवास

​डॉ. विवेक बोरसे यांनी देशातील सर्वोच्च तंत्रशिक्षण संस्था असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Bombay) येथून पीएच.डी. (Ph.D.) पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान (Medical Technology) या विषयात विशेष प्रावीण्य संपादन केले असून, शैक्षणिक संशोधन आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योग (MedTech Industry) या दोन्ही क्षेत्रांत त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची रचना आणि प्रयोगशाळेतील संशोधनाची औद्योगिक पातळीवर प्रत्यक्ष अंमलबजावणी या क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

 

​संशोधनाचा आंतरराष्ट्रीय प्रभाव अधोरेखित

​स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या वतीने दरवर्षी जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्याचा, शोधनिबंधांचा आणि त्यांच्या जागतिक प्रभावाचा कठोर वैज्ञानिक निकषांवर सखोल अभ्यास करून ही यादी तयार केली जाते. जगभरातील लाखो शास्त्रज्ञांमधून सलग दोन वर्षे अव्वल २ टक्क्यांमध्ये स्थान मिळवणे ही डॉ. बोरसे यांच्या संशोधन प्रवासातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद उपलब्धी मानली जात आहे.

 

​”संशोधनातील प्रगती ही केवळ एका व्यक्तीची नसून सामूहिक प्रयत्न, सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण यांतून घडत असते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यात मार्गदर्शन करणारे माझे सर्व गुरुजन, सहकारी संशोधक आणि सहकाऱ्यांचा वाटा मोलाचा आहे.”

— डॉ. विवेक बोरसे

 

​समाजोपयोगी संशोधनाचा मानस

​आपल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना डॉ. बोरसे यांनी आगामी काळातही वैज्ञानिक संशोधनाला अधिक गती देणे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ सामान्य समाजाला होईल अशा आरोग्यविषयक तंत्रज्ञानावर भर देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

 

​डॉ. बोरसे यांच्या या जागतिक यशामुळे देशातील शैक्षणिक आणि वैज्ञानिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत असून, हे यश संशोधन क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. डॉ.विवेक बोरसे हे अमळनेर येथील बीएसएनएलचे निवृत्त अधिक्षक श्री. भास्कर बोरसे यांचे सुपुत्र आहेत.

यशवंत आश्रमशाळेला मुंबईत ‘बेस्ट स्कूल – स्टेट बोर्ड’ पुरस्कार ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’मध्ये सन्मान; संस्थेच्या मार्गदर्शनासह शिक्षकांच्या परिश्रमांचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी : पिंपळे बु. येथील सु. अ. पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेला ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत ‘बेस्ट स्कूल – स्टेट बोर्ड’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सोहळ्यात शाळेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. ESFE (Education Supply and Franchise Expo) आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमधील शिस्त, स्वच्छता, संस्कार आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळेने केलेल्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात शाळेने अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमातही प्रथम पुरस्कार प्राप्त केला होता.

शाळेच्या प्रगतीत माध्यमिक मुख्याध्यापक उदय आत्माराम पाटील आणि प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई युवराज पाटील, सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील आणि संचालक ॲड. अभिजीतदादा पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

तीन दिवसांत साडेबारा हजार नागरिकांची भेट; ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचा दिमाखात समारोप सरकारी योजनांची माहिती एकाच छताखाली; उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विभागांचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी : खा. स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी उत्साहात समारोप झाला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला तीन दिवसांत साडेबारा हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली.

कृषी, हस्तकला, नाबार्ड, अणुऊर्जा, संरक्षण, भारतीय तंत्रज्ञान संस्था यांसह विविध शासकीय विभागांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना नौदल व हवाई दलातील करिअरच्या संधींसह नागरिकांना सरकारी योजनांची माहिती मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी असे प्रदर्शन आयोजित करणे आव्हानात्मक असतानाही नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले.

आमदार अनिलदादा पाटील यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाचे कौतुक करत, खासदार म्हणून स्मिताताई वाघ यांनी अमळनेरकरांना केंद्रस्तरीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिल्याचे गौरवोद्गार काढले. आमदार अमोल पाटील यांनीही प्रदर्शनातून शासनाच्या विविध उपक्रमांची व्यापक माहिती मिळाल्याचे नमूद केले.

समारोपप्रसंगी उत्कृष्ट सादरीकरणासाठी विविध विभागांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार यंत्र इंडिया लिमिटेड व म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांना, नवोपक्रमासाठी आयआयटी मुंबईला, वित्तीय साक्षरतेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला, तर संवाद व नवोपक्रमासाठी महाजेनकोला गौरविण्यात आले. याशिवाय महावितरण, अणुऊर्जा विभाग, भारतीय मानक ब्युरो, डिजिटल इंडिया-भाषिणी, महापारेषण, आयुष मंत्रालय, सीएसआयआर, भारतीय स्टेट बँक, भारतीय चहा मंडळ आणि आयआरसीटीसी यांचाही विविध श्रेणींमध्ये सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार अमोल पाटील, भाजपच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक, संजय पाटील यांनी सूत्रसंचालन, तर अखिला श्रीवासन यांनी आभार प्रदर्शन केले.

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत..  विविध दुर्गा मित्र मंडळांच्या भक्तांचा हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास; मंगळ ग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण करून नवरात्रोत्सवासाठी रवाना

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या

 अमळनेर : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशातील प्रसिद्ध देवीमातेच्या तीर्थक्षेत्रांतून अखंड ज्योत आपल्या गावात आणण्याची भक्तिमय परंपरा जपत विविध दुर्गा मित्र मंडळांचे भक्त दरवर्षी हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अखंड तेवत ठेवलेल्या ज्योती श्री मंगळ ग्रह मंदिर, अमळनेर येथे आणून प्रथम श्री मंगळ ग्रह देवाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यंदाही विविध मंडळांच्या अखंड दुर्गाज्योतींचे अमळनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.

 

**जामनेर, उमाळा आणि वाकडी येथील मंडळांचा सहभाग**

 

यामध्ये नवदुर्गा मित्र मंडळ, कापूसवाडी, जामनेर; जय बजरंग ग्रुप, उमाळा, जळगाव; तसेच महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर या मंडळांच्या भक्तांचा सहभाग होता. संबंधित मंडळांच्या माहितीनुसार, काही भक्तांनी पावागड, सावरियाशेठ, महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर यांनी तनोट माता मंदिर, भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या परिसरातील देवीस्थानांशी संबंधित मार्गाने ज्योत आणण्याचा संकल्प पूर्ण केला. काही मंडळांच्या भक्तांनी पावागडहून परतीच्या प्रवासात शहादा, नेरी आदी मार्गांवरून आपल्या गावाकडे प्रस्थान केले.

 

यातील महाराणा ग्रुप, वाकडी, जामनेर मंडळाने सुमारे १,२५० किलोमीटरचा प्रवास करत अखंड ज्योत आणली. या प्रवासात भक्तांनी ज्योत अखंड ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली. युवक भक्तांनी अनवाणी पायांनी धावत ज्योत घेऊन येत देवीमातेची आराधना करतात. श्रद्धा, निष्ठा आणि सामूहिक सेवाभावाचे दर्शन घडविणारी ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

 

**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत; आशिष चौधरी यांच्या आरोग्य केंद्रात विश्रांती**

 

अमळनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून या दुर्गाज्योतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शांतीभूषण ट्रेडर्स, पतंजली वितरक व आरोग्य केंद्र, कचेरी रोड, अमळनेर येथे आशिष भाऊ चौधरी यांच्या वतीने ज्योतींची विधिवत पूजा करण्यात आली. भक्तांना काही वेळ विश्रांती, चहा-नाश्ता आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर हे भक्त श्री मंगळ ग्रह मंदिराकडे रवाना झाले.

 

**श्री मंगळ ग्रह मंदिरात विधिवत पूजा आणि अखंड ज्योतींचे दर्शन**

 

श्री मंगळ ग्रह मंदिरात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. दिगंबर महाले सर, विविध विश्वस्त आणि मंगळ ग्रह सेवेकरी यांच्या उपस्थितीत या ज्योतींचे सहर्ष स्वागत करण्यात आले. मंदिरात ज्योतींची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. श्री मंगळ ग्रह देवाच्या चरणी ज्योत अर्पण करून देवदर्शन व मंदिर परिसरात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर या अखंड ज्योती मंदिर परिसरात रात्रभर ठेवण्यात आल्या.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत पूजा आणि आरती करून पुढील प्रवासासाठी ज्योतींना निरोप देण्यात आला. मंदिराच्या वतीने आलेल्या सर्व भक्तांच्या निवासाची, महाप्रसादाची आणि आवश्यक सेवासुविधांची व्यवस्था करण्यात आली.

 

**हिंदू परंपरा आणि नवरात्र भक्तीचा जागर**

 

या परंपरेनुसार, गावात ज्योत पोहोचल्यानंतर तिचे स्वागत करून नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस पूजन केले जाते. अनेक कुटुंबांमध्ये घटस्थापना, देवीपूजन, उपवास आणि अन्य धार्मिक विधी श्रद्धेने केले जातात. अखंड ज्योतीच्या माध्यमातून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

 

अत्यंत कठीण प्रवास करून देवीमातेची अखंड ज्योत आपल्या गावात आणणाऱ्या या मंडळांच्या भक्तांच्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे श्री मंगळ ग्रह मंदिराच्या विश्वस्त मंडळाने कौतुक केले. मंदिराच्या वतीने सर्व भक्तांना सेवाभावाने प्रसाद देण्यात आला.

 

श्री मंगळ ग्रह मंदिराकडून दरवर्षी या भक्तांचे स्वागत करून त्यांच्या निवासाची, भोजनाची आणि अन्य आवश्यक व्यवस्थांची काळजी घेतली जाते. धार्मिक परंपरा, परस्पर सहकार्य आणि भक्तिभाव जपणारा हा उपक्रम नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात विशेष महत्त्व प्राप्त करतो.

साहित्य, कला, अर्थकारण अन् राष्ट्रवादाचा संगम; अमळनेरात उद्यापासून शारदीय व्याख्यानमाला अर्थतज्ज्ञ डॉ. आशुतोष रारावीकर, गीतकार बाबासाहेब सौदागर, नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्यासह नामवंत वक्त्यांची मांदियाळी; ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान वैचारिक मेजवानी

 

अमळनेर प्रतिनिधी : मराठी साहित्य, कला, अर्थकारण, राष्ट्रवाद आणि गझल अशा विविध विषयांचा समृद्ध वैचारिक आविष्कार घडविणारी शारदीय व्याख्यानमाला अमळनेर येथे ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर आणि प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील नामवंत वक्ते विचार मांडणार असून, साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानांना सुरुवात होईल. अर्थतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. आशुतोष रारावीकर, चित्रपट गीतकार व चरित्र अभिनेते बाबासाहेब सौदागर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे, अभिनेता-दिग्दर्शक अतुल पेठे आणि गझलकार-पत्रकार प्रदीप निफाडकर हे वक्ते या व्याख्यानमालेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

 पाच दिवस, पाच वैचारिक विषय

रविवार, ११ ऑक्टोबर : ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’

व्याख्यानमालेचा प्रारंभ मुंबई येथील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, साहित्यिक व बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या व्याख्यानाने होईल. ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयातून जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सोमवार, १२ ऑक्टोबर : ‘हिरव्या ऋतुंचा रंगमहाल’

श्रीरामपूर येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार, चरित्र अभिनेते, निसर्गकवी तसेच पटकथा-संवाद लेखक बाबासाहेब सौदागर हे ‘हिरव्या ऋतुंचा रंगमहाल’ या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. या दिवशी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील आणि डॉ. संजय देसले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर : ‘लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद’

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे हे लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक विचारांचा आणि राष्ट्रवादाचा वेध घेतील. या दिवशी हृदयरोगतज्ज्ञ दीपक शिंदे आणि जयवंतराव मन्साराम पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

बुधवार, १४ ऑक्टोबर : ‘जीवनात कला, कलेत जीवन’

पुणे येथील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्माता अतुल पेठे हे कला आणि जीवन यांच्यातील परस्परसंबंध उलगडणार आहेत. या कार्यक्रमाला नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप जोशी, डॉ. मयुरी जोशी तसेच डॉ. मनीषा भावे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर : ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’

व्याख्यानमालेचा समारोप पुणे येथील गझलकार व पत्रकार प्रदीप निफाडकर यांच्या व्याख्यानाने होईल. ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’ या विषयातून गझल या काव्यप्रकाराचा भाषिक व साहित्यिक प्रवास उलगडला जाणार आहे. या दिवशी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील, विक्रांत भास्करराव पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी आणि प्रमोद खेमचंद राणेराजपूत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

 साहित्यरसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या विचारांतून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध अनुभव मिळवून देणाऱ्या या व्याख्यानमालेचा अमळनेरातील नागरिकांनी, साहित्यप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

साहित्य, कला, अर्थकारण अन् राष्ट्रवादाचा संगम; अमळनेरात उद्यापासून शारदीय व्याख्यानमाला

 

अर्थतज्ज्ञ डॉ. आशुतोष रारावीकर, गीतकार बाबासाहेब सौदागर, नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्यासह नामवंत वक्त्यांची मांदियाळी; ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान वैचारिक मेजवानी

 

अमळनेर प्रतिनिधी : मराठी साहित्य, कला, अर्थकारण, राष्ट्रवाद आणि गझल अशा विविध विषयांचा समृद्ध वैचारिक आविष्कार घडविणारी शारदीय व्याख्यानमाला अमळनेर येथे ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर आणि प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील नामवंत वक्ते विचार मांडणार असून, साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानांना सुरुवात होईल. अर्थतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. आशुतोष रारावीकर, चित्रपट गीतकार व चरित्र अभिनेते बाबासाहेब सौदागर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे, अभिनेता-दिग्दर्शक अतुल पेठे आणि गझलकार-पत्रकार प्रदीप निफाडकर हे वक्ते या व्याख्यानमालेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

 पाच दिवस, पाच वैचारिक विषय

रविवार, ११ ऑक्टोबर : ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’

व्याख्यानमालेचा प्रारंभ मुंबई येथील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, साहित्यिक व बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या व्याख्यानाने होईल. ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयातून जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सोमवार, १२ ऑक्टोबर : ‘हिरव्या ऋतुंचा रंगमहाल’

श्रीरामपूर येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार, चरित्र अभिनेते, निसर्गकवी तसेच पटकथा-संवाद लेखक बाबासाहेब सौदागर हे ‘हिरव्या ऋतुंचा रंगमहाल’ या विषयावर रसिकांशी संवाद साधतील. या दिवशी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील आणि डॉ. संजय देसले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर : ‘लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद’

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बालाजी चिरडे हे लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक विचारांचा आणि राष्ट्रवादाचा वेध घेतील. या दिवशी हृदयरोगतज्ज्ञ दीपक शिंदे आणि जयवंतराव मन्साराम पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

बुधवार, १४ ऑक्टोबर : ‘जीवनात कला, कलेत जीवन’

पुणे येथील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्माता अतुल पेठे हे कला आणि जीवन यांच्यातील परस्परसंबंध उलगडणार आहेत. या कार्यक्रमाला नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप जोशी, डॉ. मयुरी जोशी तसेच डॉ. मनीषा भावे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर : ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’

व्याख्यानमालेचा समारोप पुणे येथील गझलकार व पत्रकार प्रदीप निफाडकर यांच्या व्याख्यानाने होईल. ‘गझलदीप — गझलेचा उर्दूतून मराठीकडे प्रवास’ या विषयातून गझल या काव्यप्रकाराचा भाषिक व साहित्यिक प्रवास उलगडला जाणार आहे. या दिवशी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील, विक्रांत भास्करराव पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी आणि प्रमोद खेमचंद राणेराजपूत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

साहित्यरसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या विचारांतून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध अनुभव मिळवून देणाऱ्या या व्याख्यानमालेचा अमळनेरातील नागरिकांनी, साहित्यप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी प्रविण पारेख तर कार्याध्यक्षपदी बिपिन पाटील

 

अमळनेर येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी गठीत झाली असुन सर्वानुमते अध्यक्षपदी प्रविण पारेख तर कार्याध्यक्षपदी बिपिन पाटील यांची निवड करण्यात आली.

       न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपुत,डॉ संदीप सराफ,पर्यांक पटेल,महेंद्र पाटील तसेच छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे संजय चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

 

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.

 

     अध्यक्ष-प्रविण पारेख,

कार्याध्यक्ष बिपीन पाटील

उपाध्यक्ष-प्रतीक कोराणी,

यश पांडे,हेमांग झाबक,अविनाश थावराणी,केयुर ठक्कर

सेक्रेटरी-अतुल राजपूत,सहसेक्रेटरी सचिन झारे,खजिनदार-पवन शर्मा,संघटक प्रतिक शाह,पूजा व्यवस्थापक शुभम वैष्णव महाराज,कार्यकारिणी सदस्य-स्वर्णदीप राजपूत रोहन आठवले, प्रणित झाबक,विशाल खिलोसीया,अमित बितराई, प्रसाद जानवे,रोहीत लोहार,निखिल पवार

      दरम्यान दरवर्षी न्यू प्लॉट विकास मंच आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा होत असतो.शहर व परिसरातील महिला भगिनी आणि युवतींसाठी हा उत्सव पर्वणी ठरत असतो.दरवर्षी उत्कृष्ट नियोजन आणि आकर्षक देखावे सादर होत असतात.गेल्या वर्षी सती माता मंदिराची प्रतिकृती हुभेहुभ साकारण्यात आली होती.यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.यावर्षी देखील खाटूश्याम मंदिराचा आकर्षक देखावा सादर होणार असून उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

       या नवरात्र महोत्सवासाठी न्यू प्लॉट महिला मचं, जैन सोशल ग्रुप,जैन जागृती मंडळ,महाराणा प्रताप मित्र मंडळ,टिळक मित्र मंडळ आदींचे अनमोल सहकार्य लाभत असते.

जातिवाचक शिवीगाळ, धमकी व खोट्या गुन्ह्यात गोवल्याच्या आरोपावरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा

 

अमळनेर | प्रतिनिधी :

      अमळनेर येथील ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक अजय भामरे यांच्या तक्रारीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचे संपादक राजकुमार भवरलाल छाजेड यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               अजय भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ ते १.१५ वाजे दरम्यान माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीसंदर्भात राजकुमार छाजेड यांनी कथितरीत्या जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे.

तसेच दि. १७ सप्टेंबर रोजी राजकुमार छाजेड यांना कुणीतरी धमकी दिल्याच्या प्रकरणात आपले नाव टाकून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोपही भामरे यांनी तक्रारीत केला आहे. 

              याबाबत माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे प्राप्त करून सत्यता पडताळली असता, आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

           या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 351(2) व 352, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 मधील कलम 3(1)(p), 3(1)(q), 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(va) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

               दरम्यान, खोट्या गुन्ह्यात गोवल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही भामरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते करीत आहेत. तक्रारीतील आरोप, उपलब्ध कागदपत्रे, पुरावे तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.

आविष्कार–२०२६ स्पर्धेत अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

 

अमळनेर : 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘आविष्कार–२०२६’ संशोधन व नवोपक्रम स्पर्धेत अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

या स्पर्धेत महाविद्यालयाच्या वतीने शितल संतोष सोनवणे, प्रज्ञा अशोकराव शिरुडकर, तेजस्विनी दिलीप पाटील, अनुजा रोहिदास पाटील आणि जान्हवी संजय पाटील या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संकल्पनेवर आधारित संशोधनात्मक मॉडेल व सादरीकरण तयार केले. सामाजिक समस्यांचे आकलन, गरजांचे मूल्यांकन, समुदायाचा सहभाग, विविध शासकीय योजना व संस्थांशी समन्वय, समाजकार्य हस्तक्षेप आणि शाश्वत सामाजिक परिवर्तन या विविध बाबींचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला.

 

या प्रकल्पाच्या निर्मितीपासून सादरीकरणापर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख प्रा.डॉ जगदीश सोनवणे, प्रा.डॉ विजयकुमार वाघमारे आणि प्रा. डॉ अस्मिता सर्वय्या यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी संशोधनाची मांडणी, मॉडेल निर्मिती, सादरीकरण कौशल्य आणि समाजकार्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रभावीपणे मांडणी करण्याची संधी मिळाली.

आविष्कार–२०२६ सारख्या संशोधनाधिष्ठित व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि समाजातील विविध प्रश्नांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित होत असल्याचे मत मार्गदर्शक प्राध्यापकांनी व्यक्त केले.

या सहभागाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन अभिजीत भांडारकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे समाजकार्य शिक्षणासोबत संशोधन व नवोपक्रमाची सांगड घालण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला आहे.

एचआयव्ही सह जगणाऱ्या महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी उल्लेखनीय कार्य; आधार बहुउद्देशीय संस्थेला स्नेहालय चा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार’

 

अमळनेर : एचआयव्ही सहजगणाऱ्या महिला व बालकांचे उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण, घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांसाठी सक्षम यंत्रणा तसेच वंचित घटकांसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या *आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांना स्नेहालय संस्था अहिल्यानगर* तर्फे प्रदान करण्यात येणारा *‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’* प्रदान करण्यात आला.

तीन दशकांपूर्वी एचआयव्ही आणि एड्स या शब्दांची समाजात प्रचंड दहशत होती. कोणताही दोष नसताना एचआयव्हीची लागण झालेल्या महिला व बालकांना समाजाकडून अमानुष वागणूक मिळत होती. उपचार, सहानुभूती आणि सामाजिक संधींपासून त्यांना वंचित ठेवले जात होते. अशा काळात स्नेहालय संस्थेने १९९२ मध्ये उपचार व निवासी पुनर्वसनाची पायवाट भारतात प्रथम निर्माण केली. १९९९ पासून जळगाव जिल्ह्यात डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद व प्रा डॉ.विजय वाघमारे यांनी आधार बहुउद्देशीय संस्थे च्या माध्यमातून ही वाट पुढे नेण्याचे काम सुरू केले.

लैंगिक कामगार महिलांना एचआयव्हीबाबत जाणीव करून देणे, एचआयव्ही बाधित महिला व त्यांच्या मुलांना उपचार व पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आईकडून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देण्याचे कार्य आधार संस्थेने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने केले आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यातील 16,000 एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबात सोबत आधार कार्यरत आहे

संस्थेने लैंगिक शोषित व वंचित महिलांना आधार कार्ड, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका, मिशन वात्सल्य ,बाल संगोपन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य सुविधा, विमा योजना आदी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासोबतच महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, बालविवाह आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवरही संस्थेने प्रभावीपणे काम केले आहे. बचत गटांसह विविध माध्यमांचा सुयोग्य वापर करून महिलांना संघटित, जागरूक व सक्षम करण्याचे कार्य संस्थेने केले.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे जळगाव जिल्ह्यातील हे कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरत आहे. वंचित महिला व बालकांना केवळ मदत न करता त्यांना आरोग्य, शिक्षण, सामाजिक सन्मान, हक्क आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या कार्याची स्नेहालय संस्थेने विशेष दखल घेतली.

*बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल* येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे मुख्य मार्गदर्शक *विवेक सावंत* प्रमुख संवादक म्हणून उपस्थित होते. नागेबाबा परिवाराचे कडुभाऊ काळे आणि स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष मा. *गिरीश कुलकर्णी* यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. भारती पाटील, पदाधिकारी व कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप ₹५० हजार, सन्मानपत्र आणि पुस्तकांचा संच असे होते.

स्नेहालय संस्थेने आधार संस्थेच्या कार्याचा गौरव करताना, “जळगाव जिल्ह्यातील आपले कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी बनले आहे. पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्काराने आपल्याला गौरविताना धन्यता वाटते,” अशा शब्दांत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद व सचिव प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी संस्थेला मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच सामाजिक कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा पुरस्कार संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल असून, भविष्यात वंचित महिला, एचआयव्ही बाधित व्यक्ती आणि बालकांच्या हक्क व पुनर्वसनासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्नेहालय संस्थेतर्फे विविध तळागाळातील सेवा कार्यांशी देणगीदार, कार्यकर्ते आणि तरुणाईला जोडण्यासाठी सन १९९५ पासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. ‘बा’, ‘बापू’ आणि ‘विनोबा’ पुरस्कार सामाजिक क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रदान केले जातात.

आधार बहुउद्देशीय संस्थेला मिळालेला ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार’ हा संस्थेच्या २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा सन्मान असून, अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

आधार बहुउद्देशीय संस्था