ब्रेकिंग
“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम

 

अमळनेर, दि. २० ऑगस्ट २०२६ : रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास पद्मश्री मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटे. ॲड. रुपेश पाटील तसेच रोटे. गनी मेमन, जळगाव यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी परिवारातील सदस्य तसेच साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक माजी प्राचार्य अरविंद सराफ सर यांच्यासह सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

मावळते अध्यक्ष रोटे. देवेंद्र कोठारी यांनी गतवर्षातील रोटरीच्या कार्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांना कॉलर, रोटरी चार्टर व हॅमर प्रदान करून पदभार सोपविला. मावळते सचिव रोटे. आशिष चौधरी यांनी नूतन सचिव रोटे. प्रशांत निकम यांच्याकडे सचिवपदाचा पदभार सुपूर्द केला. नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

असिस्टंट गव्हर्नर ॲड. रुपेश पाटील यांनी आर.आय. डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा संदेश वाचून दाखविला. प्रमुख पाहुणे मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रोटे. मकसूद बोहरी यांनी संपादित केलेल्या ‘सेवाचक्र’ रोटरी बुलेटीनचे विमोचन करण्यात आले.

आर.आय. डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये रोटरी इन्क्लेव्ह म्हणून रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सेक्रेटरी, तर रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा यांची जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. या दोघांचाही प्रमुख पाहुणे मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले की, समाजाचे आपण काही देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीतून रोटरीचे कार्य जगभर सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. रोटरीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, आजचा युवा वर्ग काही प्रमाणात भरकटलेला दिसत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज आहे. हे महत्त्वाचे काम रोटरीने हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

रोटे. गनी मेमन यांनी समाजातील वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि तेथे प्रवेशासाठी ३ ते ५ वर्षांची प्रतीक्षा यादी सुरू झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन आणि रोटरी एनी. आरती रेजा यांनी केले. आभार प्रदर्शन रोटे. प्रशांत निकम यांनी केले, तर पसायदान रोटरी एनी. पूर्वा वशिष्ठ यांनी सादर केले.

या प्रसंगी मान. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, सौ. ज्योती निकम, धरणगाव, पारोळा व चोपडा येथील रोटरी पदाधिकारी, लायन्स क्लब, अमळनेर वकील संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, श्री मंगलग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, खाशी मंडळाच्या माधुरीताई पाटील, नीरज अग्रवाल, मनोहर निकम, एडवोकेट विलास वाणी, एडवोकेट मनोहर पवार, एडवोकेट तीलोत्तमा पाटील, सौ. भारती सोनवणे यांच्यासह शहरातील मान्यवर, व्यापारी, रोटरी परिवार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशी बातमी रोटे. मकसूद बोहरी यांनी कळविली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *