अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न
अमळनेर (प्रतिनिधी):
स्थानिक नगरपरिषद अमळनेर, जिल्हा जळगाव येथे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान व त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश कंडारे आणि नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल बेंडवाल यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आयोग व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
या बैठकीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना कामाचे सुरक्षा साहित्य जसे की झाडू, तगारी, पावडी, हँड ग्लोव्हज आणि मास्क वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत घरे मिळावीत, ते राहत असलेली शासकीय निवासस्थाने त्यांच्या मालकी हक्काने नाव करून घरभाडे बंद करावे आणि सर्व कर्मचांची सेवापुस्तके अद्ययावत केली जावीत, अशा विविध विषयांवर भर देण्यात आला.
याव्यतिरिक्त, सन २००५ नंतर सेवेत रुजू होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाची रक्कम व इतर थकबाकी तात्काळ देणे, काही कर्मचाऱ्यांच्या ग्रेज्युटीमधून नगरपरिषदेने कपात केलेल्या रकमा परत करणे, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र किंवा सेवेत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नियमानुसार पेन्शन लाभ देणे आणि लाड-पागे वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करून पात्र वारसांना नेमणूक आदेश देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर आयोग व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. या बैठकीस नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख, संघटनेचे पदाधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


