ब्रेकिंग
ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार

 

डी. एल. सोशल फाउंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मिळणार बळ

अमळनेर : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या वाटचालीत अडथळा निर्माण होऊ नये, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उदात्त उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून आतापर्यंत विविध शाळांमधील तब्बल १,००० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत पोहोचविण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य यासह विविध आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. केवळ साहित्य वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड, आत्मविश्वास आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण करणे, हा ‘ज्ञानदीप अभियानाचा’ व्यापक हेतू आहे.

आता ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

‘ज्ञानदीप अभियानाला’ अधिक व्यापक आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या दिशेने डी. एल. सोशल फाउंडेशनने अमळनेर व पारोळा तालुक्यातील गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका भावना मैराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महेश संदानशिव, रिझवान मणियार, महेंद्र ढमाळ, मनोज मैराळे आणि कृष्णा निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’

‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’ या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने सुरू असलेल्या ‘ज्ञानदीप अभियानाने’ आतापर्यंत १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. आता आणखी ५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या निर्णयामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

गरजू विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी उमेद देणारे ज्ञानदीप अभियान हे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या अभियानातून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *