ब्रेकिंग
 अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले

 

अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला चांगलेच ज्ञात आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेल,” अशी भावपूर्ण ग्वाही डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी दिली.

डॉ. दिगंबर महाले यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमळनेर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते. प्रारंभी महात्मा फुले यांचे गीत दिशा संदानशिव, उषा देवरे व डी. ए. पाटील यांनी सादर केले.

यावेळी मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन तसेच युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील, तसेच पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, “अमळनेरच्या विकासासाठी केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांची गरज आहे. पाणी, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत,” असा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे डी. ए. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर बापुराव ठाकरे यांनी आभार मानले.

याप्रसंगी अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, शिक्षकांचे नेते योगेश पाटील, सुनील अहिरराव, डॉ. कुणाल पवार, ठेंग मॅडम, वाल्मीक मराठे, दिलीप बहिरम, संजय पाटील, ॲडव्होकेट रज्जाक शेख, उमेश काटे, जयेश काटे, शंकर बैसाणे, देवेंद्र महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. दिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *