ब्रेकिंग
अमळनेरमध्ये समाजकार्य पंधरवड्यात संविधान जागर

 

अमळनेर : राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या समाजकार्य पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत अमळनेर येथे मासवे, संविधान जागर अभियान आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर अभियान उत्साहात राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये, लोकशाही व्यवस्था, मूलभूत अधिकार व कर्तव्यांबाबत जागृती निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी संविधान जागर अभियानाचे समन्वयक निखिल रांजणकर यांनी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची हमी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आत्मसात करून ती समाजजीवनात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील होते. त्यांनी संविधान जागृतीची आवश्यकता अधोरेखित करताना युवकांनी संविधानाचा सखोल अभ्यास करून लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता खेडकर, डॉ. विजयकुमार वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सर्वय्या, प्रा. धनराज ढगे, डॉ. भरत खंडागळे, डॉ. सागरराज चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समाजकार्य पंधरवड्याच्या माध्यमातून संविधानाच्या लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *