ब्रेकिंग
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांत पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ११ अधिकारी, १२५ अंमलदारांसह दंगा नियंत्रण पथक व QRT तैनात

 

अमळनेर | प्रतिनिधी

आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून आज दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.२० वाजेच्या दरम्यान शहरातील संवेदनशील भागांत भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमुळे शहरात पोलिसांची दक्षता आणि सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी दर्शन घडले.

हा रूट मार्च मा. श्री. श्रीकांत धिवरे सो., पोलीस अधिक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते सो., अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परिमंडळ तसेच मा. श्री. विनायक कोते सो., उपविभागीय पोलीस अमळनेर भाग, अमळनेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डी.पी., आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी आदी संवेदनशील भागांतून हा रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्चसाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे ०६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवड पोलीस स्टेशनचे ०२ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी व १० अंमलदार, धरणगाव पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी व ०३ अंमलदार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ०३ अंमलदार, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे ०३ अंमलदार, तसेच पोलीस मुख्यालयाकडील ०३ दंगा नियंत्रण पथके आणि ०१ QRT पथक सहभागी झाले होते.

अशाप्रकारे एकूण ११ अधिकारी व १२५ अंमलदार रूट मार्चमध्ये सहभागी झाले. यासोबतच पोलीस मुख्यालय, जळगावकडील बँड पथक देखील उपस्थित होते.

ईद-ए-मिलाद सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील संवेदनशील भागांतून काढण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश नागरिकांना देण्यात आला.

रूट मार्चदरम्यान पोलिसांचा शिस्तबद्ध ताफा पाहून नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *