ब्रेकिंग
‘माझ्यावरील आरोप बिनबुडाचे’; माजी आमदार शिरीष चौधरींचे पत्रकार परिषदेत खंडन, आमदार अनिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्वतःवरील विविध आरोपांचे ठामपणे खंडन करत, ते राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्यावरही गंभीर आरोप करत तालुक्यातील विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना शिरीष चौधरी यांनी, “माझ्याविरुद्ध करण्यात येणारे आरोप हे वस्तुस्थितीशी विसंगत असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय द्वेषातून माझी प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा आरोप केला.

यावेळी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विकासकामे, प्रशासन आणि विविध स्थानिक मुद्द्यांवर गंभीर आरोप केले. तसेच जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेनंतर अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, दोन्ही नेत्यांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मांडलेले दावे असून, संबंधित आरोपांवर आमदार अनिल पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत उपलब्ध झाली नव्हती. त्यांची भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये संताप; एन.मुक्टो.कडून काळ्या फिती लावून तीव्र निषेध

 

अमळनेर | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) स्थानिक शाखेच्या वतीने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवित विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली.

महाविद्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनात प्राध्यापकांनी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचा निषेध केला. स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव यांनी, “शांततापूर्ण आंदोलन करणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक आणि लोकशाही अधिकार असून, त्यावर अशा प्रकारे निर्बंध आणणे किंवा दडपशाही करणे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.

तर एन.मुक्टो.चे जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील यांनी, “विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर हिंसात्मक कारवाई करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे सांगितले.

यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांना निषेधाचे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला.

या आंदोलनात एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भगवान भालेराव, सचिव डॉ. महादेव तोंडे, जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, प्रा. डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांवरील कारवाईविरोधात अमळनेरमध्ये झालेल्या या निषेध आंदोलनातून लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली.

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘विठू नामाचा गजर’; भक्तिरसात रंगली आषाढी एकादशीची दिंडी, रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष

 

अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीने भारावलेल्या वातावरणात पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठू नामाच्या अखंड गजराने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला, तर दिंडी यात्रेने आणि रिंगण सोहळ्याने उपस्थितांना जणू पंढरपूरच्या वारीचाच आनंद अनुभवायला मिळाला.

सकाळच्या मंगलप्रहरी शाळेचा परिसर आकर्षक रांगोळ्या, पुष्पसजावट, कमानी आणि सुंदर मंचाने सजविण्यात आला होता. संपूर्ण परिसर भक्तिरसाने नटला होता. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई तसेच विठू माऊली यांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले.

“ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेत जणू चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूरची वारी अवतरल्याची अनुभूती सर्वांना आली.

कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले. दिंडी यात्रेतही विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विठ्ठलभक्तीचा संदेश दिला.

यावेळी पालखी पूजन मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी आणि पर्यवेक्षिका एम. एस. बारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच दक्षा शर्मा हिने प्रतीकात्मक विठुरायाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारून उपस्थितांची वाहवा मिळविली.

या भक्तिमय उपक्रमासाठी मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी, व्ही. जी. बोरोले, अशोक महाजन, व्ही. एस. अमृतकर, एस. पी. पाटील, सविता पारधी, योगिशा महाजन, अनंत बागल तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या भक्तिमय दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार रुजविण्याचा सुंदर प्रयत्न यशस्वी ठरला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.

अमळनेर एसटी आगारात अत्याधुनिक ५ नव्या बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधांचा प्रवास!

अमळनेर : अमळनेर एसटी आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा ५ नव्या बसेसची भर पडली असून, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नव्या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

अशोक लेलंड कंपनीच्या या नवीन बसेस ३ बाय २ आसनरचनेच्या असून प्रत्येक बसमध्ये ५२ आसने उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट, बसच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, माईक प्रणाली, बॅक कॅमेरा, एअर सस्पेन्शन तसेच बीएस-६ मॉडेलचे अत्याधुनिक इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षिततेसोबतच अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

अमळनेर आगाराने आणखी ५ नवीन बसेसची मागणी केली असून, त्या मंजूर व्हाव्यात यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वीही त्यांच्या प्रयत्नांतून अमळनेर आगाराला ५ नवीन बसेस मिळाल्या होत्या. या नव्या बसेसच्या समावेशामुळे अमळनेर आगारातील एकूण बसेसची संख्या आता ७५ वर पोहोचली आहे.

लोकार्पणानंतर आमदारांनी केली बस सवारी

लोकार्पणानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसह नव्या बसमध्ये प्रवास करून बसेसची पाहणी केली. यावेळी उपस्थितांनी नव्या बसेसचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.

पंढरपूर यात्रेसाठी एसटीला मोठी पसंती

सध्या पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी आषाढी महोत्सवानिमित्त एसटी सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज ३ ते ४ बसेस पंढरपूरकडे रवाना होत असून, ग्रामीण भागातून ४० ते ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रवाशांना शासनाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सवलतींचाही लाभ दिला जात आहे.

याशिवाय पंढरपूर यात्रेसाठी अमळनेर आगारातून १२ बसेस इतर आगारांकडे उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.

लोकार्पण सोहळ्यास कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील, पत्रकार किरण पाटील, एस. टी. मोरे, गौरव पाटील, आगार व्यवस्थापक राकेश शिवदे, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने, वरिष्ठ लिपिक तुषार पाटील, अकाऊंटंट अमोल पाटील तसेच एसटी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक’ अमळनेर कृउबात लोकार्पित; शेतकऱ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे स्मारक ठरेल – आमदार अनिल पाटील”

 

अमळनेर : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या शेतकरी रूपातील बैलगाडी हाकतानाच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रेरणा स्मारकाचे जयंतीनिमित्त लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या स्मारकाचे पूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, “अजितदादांचे हे प्रेरणा स्मारक केवळ पुतळा नसून शेतकऱ्यांसाठी कष्ट, धैर्य, वक्तशीरपणा आणि विकासाची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल. येणाऱ्या पिढ्यांनाही त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे हे स्मारक कायम प्रेरणादायी राहील.”

आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळाच्या पुढाकारातून हे स्मारक साकारण्यात आले आहे. शेतकरी रूपातील बैलगाडीवर स्वार असलेल्या अजितदादा पवार यांच्या प्रतिमेमुळे ग्रामीण जीवनाशी असलेली त्यांची नाळ अधोरेखित करण्यात आली आहे.

याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी बाजार समितीच्या वतीने ‘बळीराजा शेतकरी सेतू सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले. या केंद्रातून केवळ शासकीय शुल्कात विविध ऑनलाइन योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचे उद्घाटनही आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात सभापती अशोक पाटील म्हणाले की, “अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व होते. त्यांच्या विचारातून आणि आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे प्रेरणा स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच बाजार समितीच्या बांधकामाधीन व्यापारी संकुलाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्याचाही मानस आहे.”

या सोहळ्यास सौ. जयश्री पाटील, अशोक पाटील, सुरेश पिरन पाटील, संभाजी पाटील, गणेश भामरे, सचिन पाटील, सुषमा देसले, भोजमल पाटील, समाधान धनगर, भाईदास भिल, डॉ. अनिल शिंदे, हिरालाल पाटील, शरद पाटील, प्रकाश अमृतकार, रणजित शिंदे, भागवत पाटील, चेतन राजपूत, प्रा. मंदाकिनी भामरे, रिता बाविस्कर, आशा चावरीया, अलका पवार, कविता पवार, शोभाताई गढरे, सुरेश विक्रम पाटील, एल. टी. पाटील, राजू फापोरेकर, जितू ठाकूर, विजय पाटील, मुख्तार खाटिक, हेमंत पवार, जितेंद्र झाबक, निलेश भांडारकर, अनिल अहिरराव, दिनेश शेलकर, अलीम मुजावर, गौरव पाटील तसेच सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रणजित शिंदे यांनी मानले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उभारण्यात आलेल्या या शेतकरी प्रेरणा स्मारकामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

Read More “अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक’ अमळनेर कृउबात लोकार्पित; शेतकऱ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे स्मारक ठरेल – आमदार अनिल पाटील”

“फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता “लावलेले प्रत्येक झाड जगलेच पाहिजे” हा दृढ संकल्प करत जयनिल फाउंडेशनने अमळनेर शहरात भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाची सुरुवात केली आहे. “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” हा संदेश देत फाउंडेशनने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा दाखवली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अमळनेर शहर अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक व्हावे, तसेच भावी पिढीला स्वच्छ व निरोगी वातावरण लाभावे या उद्देशाने शेकडो वृक्ष लागवडीचा संकल्प जयनिल फाउंडेशनने केला आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणानंतर झाडांची जबाबदारी स्वीकारणे. अनेक ठिकाणी झाडे लावली जातात; मात्र त्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन जयनिल फाउंडेशनने प्रत्येक वृक्षासाठी ट्री गार्ड, वेळोवेळी खत, आवश्यकतेनुसार पाणी आणि नियमित निगा राखण्याचा निर्णय घेतला असून झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

यावेळी जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे खरे रक्षण करायचे असेल तर केवळ वृक्षारोपण करून उपयोग नाही, तर प्रत्येक झाड जगवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आमचा भर केवळ लागवडीवर नसून वृक्षसंवर्धनावर आहे. या पावसाळ्यात अमळनेर अधिक हिरवेगार करण्यासाठी आम्ही व्यापक वृक्षलागवड आणि संगोपन मोहीम राबवणार आहोत.”

यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले. “आज जिवंत ठेवलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या वृक्षारोपण अभियानात पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र चौधरी, पोलिस काँस्टेबल सुनिल पाटील, आरिफ मेवाती, किरण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, टिल्लू पाटील, प्रशांत पाटील, किशोर महाजन, योगेश राजपूत, वरद कासार, अभिषेक भदाणे, मेहुल चौधरी, राहुल पाटील, भूषण पाटील, भूषण लोहार, विशाल पाटील, पियुष पाटील यांच्यासह जयनिल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शहरभरातून या उपक्रमाचे कौतुक होत असून “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे” हा प्रभावी संदेश देणारा जयनिल फाउंडेशनचा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील आणि दीर्घकालीन दृष्टीकोन स्वीकारणाऱ्या या अभियानामुळे अमळनेरच्या हरित भविष्यास नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Read More “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

अमळनेर हादरले! महावितरणच्या वायरमन शरद गोसावी यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात महावितरणमध्ये कार्यरत असलेले वायरमन शरद गोसावी यांचा कामादरम्यान विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. या घटनेमुळे महावितरण कर्मचारीवर्गासह संपूर्ण अमळनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वीजपुरवठ्याशी संबंधित काम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने शरद गोसावी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

कर्तव्य बजावत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, शरद गोसावी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शासकीय स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेचे नेमके कारण आणि अपघाताची परिस्थिती याबाबत संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू असून, आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

Read More अमळनेर हादरले! महावितरणच्या वायरमन शरद गोसावी यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळाले रंगमंच

 

अमळनेर | दि. १९ जुलै २०२६ — रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम शाळा परिसरातील रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेली भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. अमळनेर शहर व परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या कल्पकतेचा, रंगसंगतीचा आणि कलात्मक कौशल्याचा अप्रतिम आविष्कार सादर केला.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रकार व शिल्पकार श्री. प्रल्हाद सोनार (शिरपूर) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्त्व, सर्जनशील विचारांची गरज आणि कलेतून व्यक्त होणाऱ्या सामाजिक जाणिवांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमधून कल्पनाशक्ती, सामाजिक भान, पर्यावरण जागरूकता आणि रंगांच्या सुरेख मिलाफाचे प्रभावी दर्शन घडले. परीक्षकांनी सर्व कलाकृतींचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट चित्रांची निवड केली.

या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख रोटे. देवांग शाह व रोटे. डॉ. शरद बाविस्कर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण आयोजनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. दिनेश पालवे सर यांनी केले.

यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. सचिव रोटे. प्रशांत निकम यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटे. किर्ती कोठारी, रोटे. पूनम कोचर, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. सनी कोठारी, रोटे. सचिन कोठावदे, रोटे. ईश्वर सैनानी, रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन, रोटे. चेलाराम सैनानी यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य सक्रियपणे उपस्थित होते.

तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी पाटील सर, मार्ते मॅडम, परदेशी मॅडम आणि पाठक सर यांच्यासह सर्व चित्रकला शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब अमळनेरतर्फे सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा उपक्रम अविस्मरणीय ठरला. रोटरी क्लब अमळनेरचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध

 

अमळनेर | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, शिक्षणावरील वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र विकास आघाडी, अमळनेर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात मा. उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना निवेदन देऊन शासनापर्यंत भावना पोहोचविण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटना व परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी श्री. सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्याची घटना लोकशाही मूल्यांवर आघात करणारी असून, या कारवाईचा महाविकास आघाडीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण या देशाच्या भविष्याशी निगडित अत्यंत गंभीर समस्या आहेत. या प्रश्नांवर सरकारने ठोस उपाययोजना करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर दडपशाहीचे धोरण अवलंबणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या घटक पक्षांच्या वतीने अमळनेर तालुका महाविकास आघाडीने श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

या प्रसंगी डॉ. बी. एस. पाटील, डॉ. रविंद्र पाटील, चिंधू वानखेडे, डी. एम. पाटील, बी. के. सूर्यवंशी, धनगर दला पाटील, सुरेश पिरन पाटील, प्रा. अशोक पाटील, अरुण बाबूराव देशमुख, संदीप बाबूराव घोरपडे, अनंत निकम, संतोष पाटील, बन्सीलाल भागवत, चंद्रशेखर भावसार, नितीन निळे, मनोज पाटील, तुषार संधनशिव आणि शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीने शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करावी, तसेच श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील दडपशाही थांबवून लोकशाही मार्गाने संवाद साधावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

 

अमळनेर | प्रतिनिधी

संस्कृत साहित्याची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख असून, महाकवी कालिदास यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेने या परंपरेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. ‘मेघदूत’ हे महाकाव्य म्हणजे त्यांच्या उत्कट प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आणि निसर्गप्रेमाचा सर्वोच्च आविष्कार आहे, असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले.

महाकवी कालिदास दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महाविद्यालय, अमळनेर येथे ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. कोळी होते. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारती, अमळनेर शाखेच्या वतीने करण्यात आले.

आपल्या व्याख्यानात दिनेश नाईक यांनी सांगितले की, महाकवी कालिदास यांनी कठोर साधना, अभ्यास आणि प्रतिभेच्या जोरावर संस्कृत साहित्यात अजरामर स्थान प्राप्त केले. त्यांच्या साहित्यामध्ये निसर्गाचे रमणीय सौंदर्य, पर्वत, नद्या, ऋतू, प्रेम, शृंगार, मानवी भावना आणि तत्कालीन समाजजीवनाचे अत्यंत जिवंत व प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या साहित्याची सोप्या पण प्रभावी शब्दरचनेमुळे आणि विलक्षण कल्पनाशक्तीमुळे आजही जगभरातील वाचकांना भुरळ पडते.

ते पुढे म्हणाले की, महाकवी कालिदास यांनी दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके अशी सात अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या. त्यापैकी ‘मेघदूत’ हे महाकाव्य त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या साहित्याचे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून भारतीय साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध विषयांवरील दर्जेदार साहित्याचे नियमित वाचन करून आपले ज्ञान, विचारक्षमता आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य भारती अमळनेर शाखेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले. वाचन, लेखन आणि प्रभावी संवाद कौशल्ये ही आधुनिक युगातील यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर सुनिल वाघ यांनी आभार मानले.

या प्रसंगी साहित्य भारतीचे विवेक जोशी, मंगेश काळकर, सारंग गर्गे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Read More ‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न