नंदगावात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांची भव्य रॅली, भजन-आरती, काव्यवाचनासह विविध धार्मिक उपक्रम; विद्यार्थ्यांना बिस्किट व फळांचे वाटप
नंदगाव, ता. अमळनेर | दि. १२ सप्टेंबर २०२६
नंदगाव, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे शु. द्वितीया ता. १२/९/२०२६ रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता जी.प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करत रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी चक्रधर स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिमय करून टाकले. रॅलीनंतर शाळेच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर, सदभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला गावातील सदभक्त श्रीमान ज्ञानेश्वर रतन पाटील यांनी गंध, अक्षदा व पुष्पहार अर्पण करून धूप-दीप दाखविला व नतमस्तक होऊन स्वामींना अभिवादन केले.
यानंतर शाळेतील विद्यार्थिनी कृतिका राजेश पाटील, इयत्ता सहावी हिने भगवान चक्रधर स्वामींच्या कार्याविषयी थोडक्यात प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणातून तिने चक्रधर स्वामींच्या लीळेतील ‘मुक्या प्राण्यावर दया करावी’ हा प्रसंग स्पष्ट व समर्पक शब्दांत मांडत उपस्थितांची दाद मिळविली. तिच्या या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल गावातील सदभक्त श्रीमान मनोहर मोतीराम खैरनार यांनी तिला ५१ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले.
यावेळी गावातील सदभक्त व कवी शिवाभाऊ एस. ठाकरे यांनी श्री स्वामींची आरती, भजन तसेच विविध कविता सादर करून कार्यक्रमात भक्तिमय रंग भरला. यामध्ये “छाती ठोकून सांगतो मी मानभाव आहे” ही कविता विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या काव्य सादरीकरणाला गावातील भजनी मंडळाचे सदस्य श्री खुशाल व्यंकट पाटील यांनी सुरेल स्वरसाथ दिली.
कार्यक्रमादरम्यान गावातील सदभक्त श्रीमान ज्ञानेश्वर रतन खैरनार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले. तसेच श्रीमान महेंद्र शिवाजी बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, नंदगाव-लाडगाव ग्रुप ग्रामपंचायत येथेही भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिवस भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ग्रामसेवक साहेबांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप-दीप दाखविला व अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री सतीश बन्सीलाल ठाकरे व हंसराज मोतीराम खैरनार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मोबाईलद्वारे शूटिंग करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या गावातील तरुण सदभक्त चि. सचिन सुरेश पाटील यांचेही उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
एकूणच, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमलेले नंदगाव, विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त रॅली, भक्तिमय आरती-भजन, काव्यवाचन आणि सामाजिक उपक्रमांमुळे अवतार दिवसाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.
