संत सखाराम महाराज यात्रोत्सवात ‘प्लास्टिक मुक्त’ अभियानाची भव्य मोहीम
अमळनेर (प्रतिनिधी) : श्री संत सदगुरू सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त अमळनेर शहरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षाच्या वतीने *रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजता* बोरी नदी पात्रात **‘प्लास्टिक मुक्त अभियान’** आयोजित करण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हा उपक्रम सकाळच्या वेळेत हाती घेण्यात येणार आहे.
यात्रोत्सव काळात सिंगल-यूज प्लास्टिक कॅरी बॅग, कुल्फी-आईस्क्रीमचे रॅपर्स तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या प्लास्टिक पॅकेजिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने बोरी नदी परिसरात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढते. यामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी हा स्वच्छता उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियानासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, नवनियुक्त संचालक डॉ. प्रवीण महाले, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. राजू गवारे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. निलेश पाटील, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. विशाल करपे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, NSS कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
तसेच अमळनेर नगर परिषदेचे कर्मचारी, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे कार्यकर्ते, विविध महाविद्यालयांतील NSS स्वयंसेवक, तसेच योगा ग्रुप अमळनेरच्या महिला भगिनींचाही सक्रिय सहभाग या मोहिमेत राहणार आहे.
या उपक्रमाद्वारे बोरी नदी पात्र स्वच्छ करून यात्रेकरूंना स्वच्छ व सुंदर वातावरणात यात्रोत्सवाचा आनंद घेता यावा, तसेच पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी, हा मुख्य उद्देश आहे.
या अभियानाचे समन्वयक व विद्यापीठाच्या NSS सल्लागार समितीचे सदस्य, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळाचे प्रा. डॉ. मनीष करंजे यांनी निसर्गप्रेमी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, *“निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच खरी वेळ आहे. चला, आपण सर्व मिळून बोरी नदी स्वच्छ करूया आणि प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव साकार करूया.”
या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता अभियानाला हातभार लावा आणि पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी पार पाडा.
