ब्रेकिंग
अमळनेर तालुक्यात शेतातील भीषण आगींचा कहर; ज्वारी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

अमळनेर : तालुक्यात दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगींमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रांजणे आणि देवळी या गावांतील शेतांमध्ये लागलेल्या आगींनी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पहिली घटना रांजणे येथे दुपारी सुमारे 12:35 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश धुडकू पाटील आणि सतीलाल नीलकंठ पाटील यांच्या शेतात अचानक आग भडकली. क्षणातच ज्वारीच्या पिकांनी पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाढत्या तापमानामुळे किंवा इतर काही कारणांमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रविंद्र पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना सतर्क केले.

दरम्यान, दुसरी घटना देवळी येथे दुपारी सुमारे 3:45 वाजता घडली. चांदणी कुरे आणि मनोज पाटील यांच्या ज्वारीच्या शेतात लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि मोठ्या प्रमाणात पिके भस्मसात झाली.

दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. कर्मचारी फारुख शेख, जफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे, मच्छिंद्र चौधरी, वासिम पठाण आणि आकाश बाविस्कर यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

या आगींमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अशा घटनांची शक्यता वाढत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात निर्माण झालेल्या या भीतीच्या वातावरणात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens