साने गुरुजी विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत नवा उच्चांक१६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड; शाळेत जल्लोष, पेढे वाटप अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने
अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (एन.एम.एम.एस.) परीक्षेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने यंदा अभूतपूर्व यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेच्या एकूण ७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्ता यादीत तब्बल १५ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. याशिवाय साने गुरुजी कन्या हायस्कूलची एक विद्यार्थिनी देखील गुणवत्ता यादीत झळकली आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोहित रमेश पाटील, शिवम मनोहर पाटील, विराज दीपक पाटील, गोपाल किशोर शिंदे, दीपांशू योगेश पाटील, पियुष अरुण शिंदे, शिवम देविदास पाटील, ललित सुनील ठाकरे, चाणक्य प्रशांत पाटील, मनन राकेश पाटील, नरेश चंद्रकांत महाजन, पुष्कर विनोद शिंदे, हर्षल प्रदीप सोनवणे, भार्गव महेंद्र पाटील आणि पूरब राजू खंगार यांचा समावेश आहे. तसेच संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात भर घातली.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा १००० रुपये, अशा एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश असून साने गुरुजी विद्यालयाने या उद्दिष्टाला साजेसे यश मिळवले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुनील पाटील आणि शिक्षक डी. ए. धनगर यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सहाय्य मुस्ताक शेख व शुभम निकम यांनी दिले. कन्या हायस्कूलमधील विद्यार्थिनी संजना अहिरे हिला मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले, तर दीपक महाजन यांनी तांत्रिक सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी तसेच मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षेचे उद्दिष्ट व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. आगामी स्पर्धा परीक्षांमध्येही असेच यश मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ॲड. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य हे यशामागील प्रमुख घटक असल्याचे सांगितले. विराज पाटील या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत आपल्या अनुभवांची मांडणी केली.
अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठीच करावा, असे आवाहन करत या शिष्यवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
