“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे मुख्यमंत्री सहायता निधीच्या महा आरोग्य शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न
जळगाव, दि. 28 (जिमाका) — शहरात आयोजित करण्यात येणारे महा आरोग्य शिबिर हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून कार्य करावे, असे आवाहन रोहन घुगे यांनी केले.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन व सामंजस्य कराराबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दीपमाला काळे, सुरेश भोळे, तसेच निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीस मुख्यमंत्री सहायता निधी संलग्नित रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मदाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांचे अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी मागील वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच यापूर्वी आयोजित महा आरोग्य शिबिरांच्या यशस्वी अंमलबजावणीचा अनुभवही त्यांनी मांडला.
आमदार सुरेश भोळे यांनी हा उपक्रम शासकीय असला तरी सर्वांनी एकत्रितपणे टीमवर्कच्या माध्यमातून राबविणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व संसाधने आणि पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी केले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणाऱ्या महा आरोग्य शिबिरामुळे आरोग्य सेवांचा लाभ अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असल्याचे चित्र आहे.

