ब्रेकिंग
अमळनेर नगर परिषदेत बोगस बांधकाम परवानग्यांचा संशय! ५० ते ६० प्रकरणे चौकशीच्या रडारवर; मुख्याधिकाऱ्यांच्या कथित बनावट सह्या-शिक्क्यांचा वापर? हद्दीबाहेरील बांधकामांनाही परवानग्या दिल्याचा आरोप; संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता, दोषींवर कठोर कारवाईचा नगराध्यक्षांचा इशारा

 

अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगर परिषदेत बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कथित बोगस बांधकाम परवानग्यांचे प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या कथित बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून बांधकाम परवानग्या दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारची तब्बल ५० ते ६० प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा असून, या प्रकरणामुळे नगर परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

विशेष म्हणजे, नगर परिषदेच्या हद्दीबाहेरील काही बांधकामांनाही परवानग्या देण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या परवानग्या नेमक्या कोणत्या आधारे देण्यात आल्या, त्यावर कोणाच्या स्वाक्षऱ्या आहेत, तसेच अधिकृत शिक्क्यांचा वापर नियमबाह्य पद्धतीने झाला आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

या संपूर्ण प्रकरणात संबंधित अभियंत्याची भूमिका तपासली जाण्याची शक्यता असून, चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

 

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी घेतली आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी, “संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

 

आता नगर परिषद प्रशासनाकडून या संशयास्पद परवानग्यांची तपासणी कशी केली जाते, संबंधित कागदपत्रांची पडताळणी होते का आणि चौकशीअंती कोणावर कारवाई केली जाते, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे. बांधकाम परवानग्यांसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणे गरजेचे असून, या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीतून नेमके सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *