दहिवद येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ५२ लाभार्थ्यांची तपासणी
दहिवद (ता. अमळनेर) : धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा’अंतर्गत दहिवद येथे मोफत आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभाग व स्थानिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात एकूण ५२ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शिबिरात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल तसेच माता-बाल आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्थानिक पौष्टिक आहार, परसबागेचे महत्त्व आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार व आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्थानिक आदिवासी नेते, पदाधिकारी तसेच आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हस्ते धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे आणि आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते पन्नालाल मावळे, माजी उपसरपंच प्रवीण आंबा माळी, सामाजिक कार्यकर्ते गणेश माळी (बाळाभाऊ), यावल प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी खंबायत साहेब, शासकीय आश्रमशाळा दहिवदचे मुख्याध्यापक नितीन शिरसाठ सर, अधीक्षक चव्हाण सर, वैद्यकीय अधिकारी कदम मॅडम, दहिवद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घनश्याम पाटील, आश्रमशाळेतील एएनएम पवार मॅडम, ग्रामपंचायतीचे प्रशासक सुरेश कठाळे, ग्रामसेवक शेखर धनगर, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ताडेपुरा, अमळनेर येथील प्राथमिक मुख्याध्यापक रजनीकांत भामरे, कनिष्ठ लिपिक जाकीर शेख आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य केंद्रातील सर्व परिचारिका, आशा सेविका तसेच गावातील आदिवासी कार्यकर्ते समाधान पारधी, मुकेश पारधी, तेजस पारधी, भागवत पारधी, अजय पारधी, सुनील चव्हाण, नरेश पारधी, दिनेश साळुंके, अनिल चव्हाण, मिथुन चव्हाण, मनोज पारधी, सागर पारधी, प्रमोद पारधी व इतर सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
आदिवासी समाजातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पोषण व आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


