रेशनिंगच्या कारभारावर युवासेनेचा सवाल; चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा!
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी समोर येत असून, या कथित अनियमिततेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी आर. जे. शेख यांच्या कामकाजाची चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात पात्रता नसलेल्या व्यक्तींना प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लाभार्थ्यांच्या पात्रतेची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी होते का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
पुरवठा विभागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी अरेरावीची वागणूक, कामकाजात अनावश्यक विलंब तसेच काही कामांसाठी आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींची प्रत्यक्ष चौकशी करून लाभार्थ्यांच्या याद्यांची तपासणी करावी, तक्रारदारांचे जबाब नोंदवावेत आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
प्रशासनाने या तक्रारींची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी सुरू करावी. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी; अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज संतोष शेटे, शहर संघटक पंकज अरुण चौधरी, अल्पसंख्याक शहरप्रमुख शेख अल्ताफ राजा फारुख, उपतालुकाप्रमुख राहुल साहेबराव पाटील, जयेश रवींद्र चव्हाण, उपशहरप्रमुख सनी चव्हाण यांच्यासह यश साळुंखे, गौरव पाटील, मनीष चौधरी, दिनेश पाटील, शेखर देशमुख, अविनाश पवार आदी उपस्थित होते.
पुरवठा विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने तहसील प्रशासन चौकशीचे आदेश कधी देणार आणि संबंधित प्रकरणात काय कारवाई करणार, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.


